सातारा

Shivendraraje Bhosale: ना. शिवेंद्रराजेंच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या

उंटावरून शेळ्या हाकू नका : समन्वयाने कामे करण्याची सूचना

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जावली तालुक्यात पाचवड- मेढा- मुनावळे- शेंबडी या रस्त्यासह विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी वन विभागाची जागा असल्याने कामे मार्गी लागण्यास अडचणी येत आहेत. संबंधित विभाग एकमेकांवर टोलवाटोलवी करून केवळ लांबड लावत आहेत. मी आमदार, मंत्री आहे मीच सगळं करायचं का? तुमची कामे तुम्ही करायला नको का? उंटावरून शेळ्या हाकायचं बंद करा, अशा कानपिचक्या देत सर्व विभागांनी समन्वय ठेवून कामे मार्गी लावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिल्या.

येथील शासकीय विश्रामगृह येथे पाचवड- मेढा- मुनावळे- शेंबडी या रस्त्याच्या कामासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी आशिष बारकूल, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, कोयना वन्यजीव विभागाचे उपसंचालक किरण जगताप, सहायक वनसंरक्षक हाके, एमएसआयडीसीचे मुख्य अभियंता र. रा. हांडे, कार्यकारी अभियंता संतोष बम्पलवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे, उप अभियंता आर. आर. अंबेकर, मेढा सपोनि सुधीर पाटील, जावली तहसीलदार प्रवीण मुदगुल, मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

ना. शिवेंद्रराजे म्हणाले, ज्या ठिकाणी वन विभागाची जागा आहे त्या ठिकाणी काम करण्याबाबतचे प्रस्ताव तातडीने वन विभागाकडे पाठवा. आज पाठवतो, आजचे उद्या उद्याचे 10 दिवसांनी असले उद्योग आता थांबवा. वन विभागाने देखील आडमुठी भूमिका न घेता रस्ते कामासाठी लागणाऱ्या परवानग्या तातडीने द्याव्यात. प्रत्येक गोष्टीत अडवणे योग्य नाही, ही जनहिताची कामे आहेत, याची जाणीव ठेवा. कास पठार येथे रस्त्याचे रुंदीकरण नव्हे तर जेवढा आहे तेवढाच रस्ता केला जाणार आहेे.

कोणीही काहीही करेल म्हणून काय कामे थांबवायची का? असा सवाल करून ना. शिवेंद्रराजेंनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून रस्त्यांची कामे मार्गी लावावी, अशी सक्त सूचना यावेळी केली. दरम्यान, हुमगांव ते बावधन रस्ता मार्गी लावण्यासाठी कोलेवाडी- सोमर्डी येथे 600 मीटर बोगदा करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली. यावेळी जि. प. सदस्य वसंतराव मानकुमरे, संदीप परामने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT