सातारा : गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान असा नरेंद्र मोदी यांचा राजकीय प्रवास राहिला. गेली २५ वर्षे ते देशाची सेवा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना 'वुई विल डू इट' हा मंत्र दिला आहे. जगात देशाची प्रतिमा उज्ज्वल करण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
सातार्यातील शाहू कला मंदिर येथे विकसित भारत संकल्प सभा संपन्न झाली. यावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, जि. प. उपाध्यक्ष राजूभैय्या भोसले, नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अॅड. डी. जी. बनकर, भाजपचे गटनेते अविनाश कदम, लोकसभा समन्वयक सुनील काटकर, भाजपचे जिल्हा जिल्हा सरचिटणीस विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार व मनीषा पांडे, विधानसभा प्रमुख अविनाश कदम, उपाध्यक्ष व सभापती धनंजय जांभळे आदि प्रमुख उपस्थित होते.
ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० कलम हटवून एक देश, एक निशाण, एक संविधान लागू केले. नवा भारत घरात घुसून मारू शकतो हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानसारख्या दहशतवादी देशाला दाखवून दिले, ही वस्तुस्थिती आहे. मोदींनी जगात पहिल्या पाच क्रमांकामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणली. रस्ते, पूल, बंदरे, विमानतळे यांचा झपाट्याने निर्माण होत आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर कायम विश्वास ठेवून त्यांच्या कामकाजात हातभार लावला पाहिजे. मात्र काही संघटना, पक्षांकडून देशातील अस्थिर वातावरण निर्माण करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.
भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्याशी समोरासमोर लढू शकत नसल्याने विरोधी गटांकडून संशयाचे वातावरण निर्माण केले जात आहे. आताचे मोर्चे पाहिले तर ज्यांच्या काळात चुकीचे काही घडलेले नाही त्यांचेच राजीनामे मागितले जात आहेत. संविधानिक संस्थांबद्दल दूषित वातावरण निर्माण केले जात आहे. बाहेरून फंडिंग गोळा करून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न होत आहे. भारतीयांनी एकजुटीने विरोधकांचे कुटिल डाव हाणून पाडावेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याची दमदार वाटचाल सुरू आहे. आहे. सोशल मीडिया, एआयचा वापर करून माथी भडकवण्याचे विरोधकांचे प्रयत्न हाणून पाडा. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून घरकूल योजना, कर्ज माफी, कृषीपंप विजबिल माफी, लाडकी बहिण योजना, शेतकरी सन्मान योजना अशा अनेक योजनांतून हजारो कोटींची मदत लाभार्थ्यांना केली आहे.
सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी दोन्ही नेत्यांनी ताकद दिली. सातार्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगदान दिल्याचे ना. शिवेंद्रराजे यांनी सांगितले. यावेळी मेढा नगराध्यक्षा रूपाली वारागडे, उपनगराध्यक्ष विकास देशपांडे, सातारा पं. स. सभापती महेश गाडे, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, सातारा पालिका सभापती अशोक शेडगे, मंडल अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आदी उपस्थित होते.