Shivendraraje Bhosale 
सातारा

Shivendraraje Bhosale | खोटे-नाटे आरोप करणे हाच त्यांचा उद्योग : ना. शिवेंद्रराजे

ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे खा. संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र

पुढारी वृत्तसेवा

सातारा : राज्यासह देशात करण्यात येणार्‍या लोकसभा व विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेला घटनात्मक आधार आहे. ही पुनर्रचना झाल्यानंतर मतदारसंघाच्या पुनर्रचनेला विरोध करण्यासाठी भाजपवर काहीतर आरोप करणे किंवा चिखलफेक करायची एवढाच संजय राऊत यांचा विषय आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी खा. संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. दरम्यान, महाबळेश्वरमध्ये रस्त्याच्या कामाबाबत ठेकेदाराला नोटीस बजावल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

खा. संजय राऊत हे महाबळेश्वर दौर्‍यावर असताना त्यांनी भाजपवर आरोप केले होते. यावर खोटे बोलून भाजप सत्तेत येत आहे. डी-लिमिटेशनमुळे लोकशाही संपवली जाणार असल्याची टीका खा. संजय राऊत करत आहेत, याकडे लक्ष वेधले असता मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, राज्यासह देशात डी-लिमिटेशन यापूर्वी अनेकदा झाले आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेला विरोध करण्यासाठी भाजपवर काहीतर आरोप करणे किंवा चिखलफेक करायची एवढाच संजय राऊत यांचा विषय आहे. लोकसभा, विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना घटनात्मक असून त्याला वैधानिक आधार आहे.

मी पाचवेळा आमदार म्हणून निवडून आलो. त्यामध्ये विधानसभेच्या तीन निवडणुका जुन्या मतदारसंघातून लढवल्या, तर दोन निवडणुका पुनर्रचनेनंतर नव्याने झालेल्या मतदारसंघातून लढलो आहे, ही वस्तुस्थिती आहे. हे सगळीकडेच झाले आहे. उगीचच खोटेनाटे आरोप करायचे, काहीतर बोलायचे हे चुकीचे आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेचे काम देशाच्या हिताचे असून ते सोडून काहीतर वेगळंच करायचं, हे शिवसेना (उबाठा), काँग्रेस व इतर पक्षांचा उद्योग आहे. त्यांच्या आरोपात तथ्य नसल्याचा पलटवार मंत्री शिवेंद्रराजे यांनी केला.

महाबळेश्वरातील रस्त्यांवर खा. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, महाबळेश्वरमधील एकच काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. वन विभागाच्या आवश्यक परवानग्यांमुळे हे काम लांबले आहे. काम लवकर पूर्ण करण्याचे नियोजन असून संबंधित कंत्राटदाराला नोटीस दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

वाईतून नव्या घाटासाठी सर्व्हे : मंत्री शिवेंद्रराजे

महाबळेश्वर व पाचगणीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी आणखी एक घाट वाईच्या बाजूने काढण्यात येणार आहे. त्याचे सर्व्हे सुरू आहेत. घाटात एका बाजूने वर जाणे व दुसर्‍या बाजूने खाली येणे अशी वाहतुकीची सोय करता येईल का, यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री शिवेंद्रराजे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT