सातारा : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील जागावाटपाचा निर्णय मान्य करत शिवसेनेने आपला उमेदवार मागे घेतला असून महायुतीचा युतीधर्म पाळण्याचा निर्णय घेतल्याचे ना. शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख तानाजीराव पाटील यांनी या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, महायुतीतील जागावाटपाच्या चर्चेनंतर हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला आणि भाजपने धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली. यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार तानाजीराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.
याबाबत बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युतीधर्म पाळण्याच्या सूचना आहेत. तानाजीराव पाटील यांच्याशी शिंदे यांनी थेट संवाद साधला होता. तसेच आ. सुहास बाबर यांच्या उपस्थितीत कोयना दौलत येथेही चर्चा झाली होती. उमेदवारी अर्ज भरतानाच पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो मान्य राहील, असा शब्द तानाजीराव पाटील यांनी दिला होता.
ना. देसाई म्हणाले, महायुतीमधील बंडखोर व अपक्ष उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याचे महत्त्वाचे काम आम्ही पूर्ण केले. सातारा-सांगली मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, अशी आमची मागणी होती आणि त्यासाठी आम्ही एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली होती. मात्र जागावाटपात ही जागा भाजपला देण्यात आली. त्यामुळे पक्षाचा निर्णय आम्हाला मान्य असून आम्ही युतीधर्म पाळत तानाजीराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
दरम्यान, गुरुवारी सकाळी भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी कोयना दौलत या निवासस्थानी जाऊन शंभूराज देसाई यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे नेते नितीन भरगुडे-पाटील उपस्थित होते. सांगली दौऱ्यासाठी निघालेल्या मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेण्यासाठी भरगुडे पाटील यांनी वेळ घेतली होती. परंतु शंभूराज देसाई यांनी आपण पुन्हा भेटू असे म्हणत धैर्यशील कदम यांना गाडीत बसवत सांगली गाठली. महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि तिरंगी लढतीच्या चर्चांदरम्यान शिवसेनेने उमेदवारी मागे घेतल्याने आता भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या प्रचाराला महायुतीची एकत्रित ताकद मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.