प्रेषित गांधी
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यावर गेल्या तीन दशकांहून अधिक काळ स्व. बाळासाहेबदादा भिलारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, गेल्या निवडणुकांपासून राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जाणारा हा परिसर आता शिवसेनेचा बालेकिल्ला बनला आहे. यंदाच्या निवडणुकीतही शिवसेना ‘धुरंदर’ ठरली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुक्यातील 6-0 विजयाचे मनसुबे धुळीस मिळाले आहे. घरच्या भेद्यांनीच सेनेला केलेली मदत आणि नेत्यांमध्ये नसलेला समन्वय यामुळेच संजूबाबा गायकवाड यांचा धक्कादायक पराभव झाला.
तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांसमोर आता आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. प्रथमच उमेदवार उभे करून आव्हान देणाऱ्या भाजपचा सुफडा साफ झाला असून, काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील घरभेद्यांनी टाकलेले डाव, पक्षांतर्गतच वर्चस्वासाठी सुरू असलेली लढाई आणि सुप्त संघर्ष याचा फटका तळदेव गटात बसल्याचे स्पष्ट झाले आहे. स्व. बाळासाहेबदादांचे मानसपुत्र आणि राष्ट्रवादीचे युवा नेते, माजी सभापती संजूबाबा गायकवाड यांच्यासह कुंभरोशी व तळदेव गणातील उमेदवारांचा पराभव याच कारणांमुळे झाल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तापोळा परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे शिवसेनेला मोठे बळ मिळाले आहे. तापोळा परिसरातील कायापालट, मुंबईस्थित नागरिकांचा प्रभाव आणि शिवसेनेबद्दल वाढलेले आकर्षण यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे.
यंदाच्या निवडणुकीत तळदेव गट खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने मोठ्या राजकीय नेत्यांचे लक्ष या गटाकडे लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसला हा गट पुन्हा ताब्यात घेण्याची संधी मिळाली होती, तर शिवसेनेला आपले वर्चस्व कायम ठेवण्याची संधी होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी सभापती राहिलेल्या संजूबाबा गायकवाड यांना संधी देण्यात आली. मात्र, तिकीट वाटपावरून पक्षात नाराजी निर्माण झाली. कुंभरोशी गणातही जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढला. काही नेत्यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या. शिवसेनेकडून अजित संकपाळ, संजय शेलार आणि संजय मोरे यांना उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीमुळे आणि विकासकामांच्या प्रभावामुळे शिवसेनेचे उमेदवार मजबूत ठरले.
तळदेव गटात शिवसेनेचे अजित संकपाळ यांनी राष्ट्रवादीचे संजूबाबा गायकवाड यांचा सुमारे 3,000 मतांनी पराभव केला. कुंभरोशी गणात शिवसेनेचे संजय मोरे यांनी राष्ट्रवादीचे सचिन उतेकर यांचा 334 मतांनी पराभव केला. तळदेव गणात शिवसेनेचे संजय शेलार यांनी राष्ट्रवादीचे संजय उतेकर यांचा तब्बल 2,010 मतांनी पराभव केला. या विजयामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जाणारा परिसर पुन्हा एकदा शिवसेनेच्या ताब्यात गेला.