शिवतीर्थावर शिवतेजाचा नेत्रदीपक सोहळा 
सातारा

Shiv Jayanti : शिवतीर्थावर शिवतेजाचा नेत्रदीपक सोहळा

सातारच्या इतिहासातील सर्वात मोठी शिवजयंती : पहाटेपर्यंत शिवप्रेमींचा महासागर

पुढारी वृत्तसेवा

सातारा : स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहूनगरी साताऱ्यात यावर्षी साजरी झालेली शिवजयंती ही साताऱ्याच्या इतिहासातील सर्वात भव्य दिव्य, दिमाखदार आणि संस्मरणीय ठरली. मराठेशाहीचा ऐतिहासिक बाज, विविध धार्मिक व ऐतिहासिक कार्यक्रमांची रेलचेल, पोवई नाका येथील शिवतीर्थावर करण्यात आलेले आकर्षक सुशोभिकरण, नेत्रदीपक विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी आणि शिवभक्तांचा उसळलेला अभूतपूर्व जनसागर यामुळे सातारा नगरी अक्षरश: शिवमय झाली होती. साताऱ्याच्या शिवजयंतीने शिवभक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

स्वराज्याच्या स्मृती जपणाऱ्या साताऱ्याने गुरुवारी पार पडलेल्या शिवजयंतीला आपल्या ऐतिहासिक परंपरेला साजेसा थाट दाखवला. साताऱ्यातील प्रमुख रस्ते भगव्या पताकांनी आणि ऐतिहासिक कमानींनी सजले होते. गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती, शिवचरित्रातील प्रसंग दाखवणाऱ्या सजावटींमुळे संपूर्ण शहराला जणू शिवकालीन स्वरूप प्राप्त झाले होते. सर्वत्र भगवे झेंडे फडकावून शिवरायांप्रती अभिमान व्यक्त करण्यात येत होता.

शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध ऐतिहासिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवचरित्र कथन, आरत्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवरायांचे कार्य आणि स्वराज्याची परंपरा जनतेसमोर उभी करण्यात आली. अनेक ठिकाणी युवकांनी ढोल-ताशे आणि मावळ्यांच्या पारंपरिक वेशभूषेतून शिवकालीन शौर्याची झलक दाखवली. पोवई नाका येथील शिवतीर्थ हे या शिवजयंती सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले. येथे करण्यात आलेले सुशोभिकरण आणि प्रकाशयोजना विशेष लक्षवेधक ठरली.

शिवतीर्थावर उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अद्वितीय पुतळा यावर्षीच्या शिवजयंतीचा साक्षीदार ठरला. तोफेवर एक हात आणि तलवारीच्या मुठीवर दुसरा हात ठेवून उभ्या असलेल्या त्या तेजस्वी मूर्तीसमोर लाखो शिवभक्तांनी नतमस्तक होऊन अभिवादन केले. शिवतेजाची जाणीव करून देणारा हा एकमेव पुतळा सातारकरांच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग बनला आहे. याच पुतळ्याच्या साक्षीने ही अखेरची शिवजयंती साजरी होत असल्याची जाणीव अनेकांच्या मनाला चटका लावून गेली.

पुढील शिवजयंतीला हा पुतळा पोवईनाक्यावर दिसणार नाही, तो अजिंक्यताऱ्यावर असणार आहे, या विचाराने शिवभक्तांच्या मनात हुरहुर निर्माण झाली. शिवतीर्थावर तसाच पण पुणे-बंगळूर महामार्गावरून दिसेल एवढ्या उंचीचा नवा भव्य दिव्य पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याशी जुळलेली भावनिक नाळ वेगळीच आहे. अनेक शिवभक्तांनी पुतळ्यासमोर शांतपणे उभे राहून जणू मनोमन निरोप दिला. काहींच्या डोळ्यांत नकळतपणे अश्रू तरळले, तर काहींच्या कंठात विरहाची ओल निर्माण झाली. ‌‘जय भवानी जय शिवाजी‌’च्या जयघोषातही एक हळवा स्वर मिसळत होता. कित्येक पिढ्यांनी या पुतळ्यासमोर शिवरायांना प्रणाम केला होता. त्या स्मृतींची साक्ष देणारी ही मूर्ती आता इतिहासाचा भाग होणार असली, तरी शिवरायांचे तेज मात्र कायम मनामनात राहणार आहे, हीच भावना मनात ठेवून शिवभक्तांनी अखेरचा मानाचा मुजरा करत शिवतीर्थाचा निरोप घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT