शिंगणापूर यात्रेचा आज मुख्य दिवस 
सातारा

Shingnapur Yatra : मुंगीघाटात आज काठ्या-कावड्यांचा थरार

शिंगणापूर यात्रेचा आज मुख्य दिवस : लाखो भाविकांची उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

सचिन बडवे

शिखर शिंगणापूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेचा आज मुख्य दिवस असून मानाच्या कावडी मुंगीघाट चढणार आहेत. श्रद्धा, परंपरा, साहस आणि भक्तीशक्तीचा कावडसोळ्याचा थरार मुंगीघाटात रंगणार असून सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक शिंगणापूरनगरीत दाखल झाले आहेत.

शिंगणापूर यात्रेत चैत्र शुद्ध द्वादशीच्या दिवशी देवाच्या लग्नाची वरात म्हणून मानाच्या कावडी वाजतगाजत येऊन शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करतात. मुंगीघाटातून कावडी चढवण्याची परंपरा सुमारे 700 वर्षांपासून प्राचीन आहे. सासवड पंचक्रोशीतील सासवड, खळद, शिवरी, बेलसर, एखतपूर, कुंभारवळण यासह बारामती, इंदापूर, गुणवरे, माळशिरस, कण्हेर आदी ठिकाणच्या कावडी अवघड मुंगीघाट सर करत असतात.

मुंगीघाट कावडी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण घाट सोलापूर जिल्हा हद्दीत आहे तर घाटमाथा सातारा जिल्हा हद्दीमध्ये आहे. चैत्र शुद्ध द्वादशीच्या दिवशी सकाळपासून सर्व कावडी मुंगीघाटाच्या पायथ्याशी असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील कोथळे गावात जमा होतात. त्यानंतर सुमारे तीन किलोमीटरचा टप्पा चढताना हजारो भाविक भक्तीरसात न्हाऊन निघतात. ‌‘हरहर महादेव, म्हाद्या धाव‌’ अशी शिवगर्जना करत भाविक अवजड अशा कावडी घेऊन चार टप्प्यात मुंगीघाट सर करतात. खड्या असलेल्या डोंगरावरुन मानवी हातांची साखळी करुन कावडी घेऊन चढवताना भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. साहस, श्रद्धा आणि भक्तीशक्तीचा रोमहर्षक कावडसोहळा पाहण्यासाठी घाटमाथ्यावर उपस्थित असलेले लाखो भाविक श्वास रोखून कावडींचा थरार अनुभवत असतात. एकेक कावड मुंगीघाटातून माथ्यावर येताच उपस्थित लाखो भाविक टाळ्यांचा गजर करत कावडी घेऊन येणाऱ्या भाविकांचा उत्साह वाढवतात

डोंगर माथ्यावर कावडी घेऊन आल्यानंतर कावडीधारक भाविक ढोलताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत, हरहर महादेव गर्जना करत, फटाक्यांच्या आतषबाजीत, कावडी नाचवून आनंद व्यक्त करतात. सकाळपासून सुरु असलेला मुंगीघाटातील कावडी सोहळा सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरु असतो. शेवटी तेल्या भुत्याच्या मानाच्या कावडीने मुंगीघाट सर करुन शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केल्यानंतर शिंगणापूर यात्रेची सांगता होते. कावड सोहळ्याचा रोमांचकारी थरार पाहण्यासाठी लाखो भाविक शिंगणापूरनगरीत दाखल झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT