शिखर शिंगणापूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक यात्रा गुढीपाडवा ते पौर्णिमा या कालावधीत होत असते. जवळपास 8 ते 10 दिवस यात्रेचा कालावधी असतानाही प्रशासनामार्फत प्रतिवर्षी केवळ दोन ते तीन दिवसांचे नियोजन केले जाते. त्यामुळे केवळ कावडसोहळा म्हणजे शिंगणापूर यात्रा नसून प्रशासनाने संपूर्ण यात्रा कालावधीत भाविकांना मूलभूत सोयीसुविधा देण्याच्या दृष्टीने यात्रानियोजन करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांतून होत आहे.
शिखर शिंगणापूर येथील चैत्रयात्रा ही महाराष्ट्रातील मोठ्या यात्रांपैकी एक असते. शिंगणापूर यात्रेसाठी 8 ते 10 लाख भाविक येत असतात. दरवर्षी गुढीपाडवा ते पौर्णिमा या कालावधीत यात्रा पार पडते. यामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी शंभू महादेवाची गुढी उभारुन यात्रेस प्रारंभ होतो. त्यानंतर चैत्र शुद्ध पंचमीच्या दिवशी शिवपार्वती हळदी समारंभ होत असतो. पंचमीच्या दिवसापासून भाविक, व्यावसायिक यात्रेसाठी दाखल होत असतात. त्यानंतर चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशी यात्रेत ध्वज बांधण्याचा नयनरम्य सोहळा पार पडत असतो, तर याच दिवशी शिवपार्वती विवाहसोहळा होत असतो. अष्टमीच्या दिवशी जवळपास लाखो भाविक शिंगणापूरनगरीत येत असतात. त्यानंतर तीन-चार दिवस भाविकांची ये-जा सुरुच असते. एकादशी आणि द्वादशी या दिवशी भाविकांची गर्दी वाढते. द्वादशीच्या दिवशी हजारो कावडी येत असतात. यातील काही कावडी पायरी मार्गाने तर काही कावडी मुंगीघाटातून चढून येत असतात. त्यामुळे यात्रेतील सर्व कालावधीतील गर्दीचा तसेच प्रमुख धार्मिक सोहळ्याचा विचार करुन यात्रेचे नियोजन करणे गरजेचे आहे.
आठ ते दहा दिवसांच्या संपूर्ण यात्रा कालावधीत प्रशासनाने पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्यसुविधा, पोलिस बंदोबस्त, एसटी सुविधा, वाहतूक तसेच पार्किंग व्यवस्था, यासह अन्य सुविधा पुरवणे आवश्यक आहे. मात्र प्रशासनामार्फत घेतल्या जाणार्या यात्रानियोजन बैठकीत केवळ कावडसोहळा म्हणजेच शिंगणापूर यात्रा यादृष्टीने नियोजन केले जाते. त्यामुळे केवळ दोन ते तीन दिवसांचे यात्रानियोजन बैठकीत करण्यात येते. वास्तविक पाहता यात्रेतील मुख्य दिवस कोणते, कोणत्या दिवशी प्रमुख धार्मिक कार्यक्रम होतात, भाविकांचा ओघ कोणत्या कालावधीत आधिक असतो, यादृष्टीने विचार करुन प्रशासकीय यंत्रणेने संपूर्ण यात्रा कालावधीत भाविकांना मूलभूत सुविधा मिळण्याच्या दृष्टीने बैठकीत नियोजन करणे गरजेचे आहे. शिंगणापूर यात्रेत कावड सोहळ्यास विशेष महत्त्व आहे. परंतु केवळ कावडसोहळा म्हणजे शिंगणापूर यात्रा नव्हे तर यात्रेचा संपूर्ण कालावधी गृहीत धरुन देवस्थान समिती, ग्रामपंचायत तसेच प्रशासन यंत्रणेने यात्रा नियोजन करुन त्याची ठोस अंमलबजाणी करण्याची मागणी येथील पुजारी, सेवाधारी, व्यावसायिक तसेच स्थानिक ग्रामस्थांतून होत आहे.