उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे File Photo
सातारा

महाराणी ताराराणी समाधीकडे दुर्लक्ष होणार नाही : उपमुख्यमंत्री शिंदे

राज्य सरकारकडून गडकोटांचे संवर्धन

पुढारी वृत्तसेवा

सातारा : मुगलमर्दिनी महाराणी ताराराणी यांचे शौर्य अतुलनीय आहे. इतिहासातील त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या समाधिस्थळाकडे शासनाचे दुर्लक्ष होणार नाही. समाधी जीर्णोद्धाराबाबत शासन सकारात्मक असून, हा प्रश्न मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दै. ‘पुढारी’ने प्रसिद्ध केलेल्या मुघलमर्दिनी महाराणी ताराराणी समाधी उपेक्षितच या बातमीच्या अनुषंगाने ते बोलत होते. दरम्यान, राज्य सरकारकडून गडकोटांचे संरक्षण करण्यात येत असल्याचेही ना. शिंदे यांनी सांगितले.

मराठा साम्राज्यातील महापराक्रमी, मुघलमर्दिनी करवीर संस्थापिका छत्रपती महाराणी ताराराणी यांचा धगधगता इतिहास आजही वीरश्री निर्माण करणारा आहे. मात्र, अशा महापराक्रमी महाराणीचे सातार्‍यातील संगम माहुली येथील समाधीस्थळ अनेक वर्षांपासून उपेक्षितच आहे. याबाबत अनेकदा इतिहासप्रेमींनी नाराजी व्यक्त करून या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिदे मुख्यमंत्री असताना जुलै 2024 मध्ये सातार्‍यात महाराणी ताराराणी यांच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करण्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. याबाबत दै. ‘पुढारी’ने शुक्रवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या दरे (ता. महाबळेश्वर) या गावी आहेत. दै. ‘पुढारी’च्या वृत्तानंतर त्यांनी शुक्रवारी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, स्वराज्य विस्तारात महाराणी ताराराणी यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या समाधीच्या बाबतीत कुठेही दुर्लक्ष होणार नाही. मराठा साम्राज्याचा जाज्वल्य इतिहास आहे. त्यासाठीच राज्य सरकार गडकोटांचे जतन व संवर्धन करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ल्यांपैकी 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश झाला असून हे आपले मोठे यश आहे. मराठा साम्राज्याच्या इतिहासाबाबत सरकार कुठेही कमी कमी पडणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT