म्हसवड : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व भाजपचे नेते शेखर गोरे यांच्या राजकीय प्रवेशाचा अखेर मुहूर्त ठरला असून दि. १ सप्टेंबर रोजी मुंबईत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश करत आहेत. शेखर गोरे यांनी हा निर्णय घेत त्यांचे बंधू व राज्याचे ग्राम विकासमंत्री जयकुमार गोरे यांना मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे माण-खटाव विधानसभा मतदार संघातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची चिन्हे आहेत.
शेखर गोेरे हे सातारा जिल्ह्याच्या राजकारणात आक्रमक व लढावू नेते म्हणून ओळखले जातात. पूर्वी त्यांनी त्यांचे बंधू जयकुमार गोरे यांच्या विरोधातही विधानसभेच्या निवडणुका लढवल्या आहेत. त्यात त्यांना लक्षवेधी मतेही मिळाली होती. गतविधानसभेच्या निवडणुकीवेळी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने गोरे बंधूंमध्ये मनोमीलन घडवण्यात आले.
जयकुमार गोरे यांच्या विजयात शेखर गोरे यांनी वाटा उचलल्याचा दावा त्यांनी अनेकदा केला आहे; मात्र त्यावेळी दिलेला शब्द फडणवीस व भाजपने न पाळल्याचा शेखर गोरे यांचा आक्षेप आहे. त्यातच विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने शेखर गोरे हे नाराज होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला नाही, उमेदवारी डावलण्यात आल्याने गोरे यांनी भाजपपासून अंतर राखले होते. आता त्यांनी ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याने माण-खटावच्या राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू होणार आहे.
माण - खटावची समीकरणे बदलणार
शेखर गोरे यांचा शिवसेना प्रवेश हा केवळ मतदारसंघापुरता मर्यादित न राहता माण - खटावच्या राजकारणासह सातारा जिल्हा बँकेच्या राजकारणावरही परिणाम करणारा ठरू शकतो. जिल्हा बँकेतील संचालकांचे राजकीय गट आणि त्यांच्यामागील सत्ताकेंद्रे लक्षात घेता गोरे यांच्या भूमिकेमुळे बँकेतील सत्तेचे गणितही बदलण्याची शक्यता आहे. शेखर गोरे यांच्या निर्णयामुळे माण-खटावमध्ये ना. जयकुमार गोरे यांच्या विरोधातील राजकीय ताकद एकवटण्याच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. गोरे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर जिल्हा बँक, माण-खटाव मतदारसंघ आणि सातारा जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांमध्ये नेमके कोणते बदल होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.