सातारा : संघटनेच्या माध्यमातून पवारसाहेबांनी या महाराष्ट्रात इतिहास घडवला, पक्ष संघटना बांधली आहे. आज संघर्षाचा काळ आहे. त्यावेळेला निश्चितपणाने लोकांना अपेक्षित अशा प्रकारचे नेतृत्व पवारसाहेबांनी उभे केले आहे. प्रदेशाध्यक्ष पदाबाबत शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे ही वरिष्ठ मंडळी निर्णय घेतील. मला जर संधी मिळाली तर आर. आर. आबा यांच्या सारखेच काम करेन, अशा शब्दांत आ. शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची धुरा तब्बल आठ वर्षे समर्थपणे सांभाळणार्या आ. जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी आ. शिंदे बोलत होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आ. जयंत पाटील यांच्याच नेतृत्वाखाली होतील, असे स्पष्टीकरण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले होते. तरीही आ. पाटील यांनी राजीनामा दिल्याने आता पक्षाला नवी खांद्याची गरज पडली आहे. सातारा व नवी मुंबईमध्ये राजकीय प्रभाव असलेले व या पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी आ. शशिकांत शिंदे हे थोरल्या पवारांचे अतिशय विश्वासू कार्यकर्ते आहेत.
धाडसी राजकारणी म्हणूनही त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. विरोधकांना शिंगावर घेण्याची हिंमत त्यांनी अनेकदा दाखवून दिली आहे. पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये यश खेचून आणण्यासाठी पक्षाला आता तितक्याच ताकदीच्या प्रदेशाध्यक्षाची गरज पडणार असून ही जबाबदारी आ. शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर देऊन पक्षाचा सुवर्णकाळ पुन्हा आणण्यासाठी थोरले पवार व्यूहरचना आखण्याच्या तयारीत आहेत. आ. शिंदे यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी निश्चित घेतले जात आहे. प्रदेशाध्यक्ष पदाबाबतची औपचारिक घोषणा दि. 15 जुलैला केली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना आ. शशिकांत शिंदे म्हणाले, आ. जयंत पाटील यांच्यासारख्या अध्यक्षांनी ज्या पद्धतीने काम केले आहे, त्याची तुलना होऊ शकत नाही. पक्ष बांधण्यासाठी संघर्षात आम्ही एकजुटीनं, एकोप्यानं उभं राहू, साहेबांच्या पक्षाची प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न 100 टक्के करु. मला संधी मिळाली तर आर.आर. आबा यांच्याप्रमाणे कामाचा ठसा उमटवेन. बेरोजगारीचा प्रश्न आहेत. जनतेची फसवणूक करणार्या महायुती सरकारचा पोल-खोल आगामी काळात करु, असे आ. शशिकांत शिंदे म्हणाले.
पवारसाहेब, सुप्रियाताई, जयंत पाटील आणि पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. 15 तारखेला पक्षाची बैठक आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी माझंही नाव चर्चेत आहे. ज्यावेळेला निर्णय होईल, निवड होईल, त्यावेळी निश्चितपणानं काम करू. राज्यातील बेरोजगार व शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्याचं सर्वात मोठं आव्हान आमच्यापुढे असणार आहे.- आ. शशिकांत शिंदे