Shashikant Shinde | शरद पवारांचा वारसा पुढे चालवू : आ. शशिकांत शिंदे File Photo
सातारा

Shashikant Shinde | शरद पवारांचा वारसा पुढे चालवू : आ. शशिकांत शिंदे

पक्षाला पुन्हा एकदा नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुरोगामी विचारांचा वसा आणि वारसा घेऊन महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या, कष्टकर्‍यांच्या, शेतकरी बांधवांच्या हितासाठी लढणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष. या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर खा. शरद पवार यांनी विश्वासाने दिली. त्यांच्या या विश्वासाला न्याय देईन, खा. शरद पवार यांच्या विचारांचा वारसा आम्ही पुढे चालवू, अशी भावना शरदचंद्र पवार पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

आ. शिंदे यांनी पुढे म्हटले आहे की, संघर्षाच्या काळात आम्हा सर्वांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून सर्व कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठेचा वस्तुपाठ घालून दिला असे मावळते प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी गेली 7 वर्षे पक्षाची धुरा अत्यंत सक्षमपणे पेलली. खा. शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वात काम करत असताना आजपर्यंत दिलेल्या जबाबदारीला पूर्णपणे न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहिला.

जावली मतदारसंघापासून सुरू झालेला हा प्रवास आज प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत येऊन पोहोचला आहे. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि आपण सर्वजण माझे नेते आहात, असे मानूनच मी काम करत राहीन. नवी फळी उभी करून महाराष्ट्रात स्वाभिमानाने आणि निष्ठेने इतिहास घडवायचा आहे. पक्षाला पुन्हा एकदा नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी मी कटिबद्ध आहे. माझी निष्ठा ही शरदचंद्रजी पवार यांच्या चरणाशी राहिली.

आजवर निष्ठेने आणि स्वाभिमानाने समाजातील प्रत्येक घटकाविषयी लढा देत आलो आहे. त्याचे फलित म्हणूनच आज पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आणि ही जबाबदारी मी नम्रपणे स्वीकारतो. आदरणीय शरद पवार, आ. जयंत पाटील, खा.सुप्रियाताई सुळे तसेच पक्षातील सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मी मनापासून आभार मानतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT