सातारा : स्व. अजितदादा पवार यांच्या पत्नी खा. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. हा शपथविधी होणार असल्याची आमच्या पक्षाला कल्पना नव्हती. माध्यमांमधूनच हे आम्हाला कळाले. अजित पवार यांच्या पक्षातील काही नेते आणि त्यांचा मित्र पक्ष असलेला भाजप व मुख्यमंत्री यांनी कुठल्या भीतीपोटी व अचानकपणे हा निर्णय घेतला, हे कळायला मार्ग नाही, असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
शिंदे म्हणाले, अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे पवार कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्र दु:खात आहे. या घटनेनंतर सुनेत्रा वहिनींच्या कुटुंबालाही आम्ही भेटलो. तेव्हाही कोणतीच चर्चा करण्याची परिस्थिती नव्हती. सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय अत्यंत घाईगडबडीने आणि अचानकपणे घेतला आहे. हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय आहे. अजित पवारांना जाऊन दहा दिवसही उलटले नाहीत तोवर मुख्यमंत्री यांनी सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय इतक्या घाईने का घेतला? त्यांना कशाची भीती होती का?असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
अजित पवार यांच्या गटाचे नेते दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती, असे म्हणत आहेत, याबाबत छेडले असता आ. शिंदे म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादींना एकत्रित आणण्याचे प्रयत्न अजित पवार यांनीच सुरु केले होते. 12 फेब्रुवारीला एकत्रीकरण ठरले होते. महापालिका निवडणुकीनंतर एकत्र येण्याची चर्चा होती. आम्ही महापालिका निवडणुका एकत्र लढलो. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका झाल्यानंतर एकत्रीकरणाचा निर्णय घ्यायचा, असे ठरले. त्यामुळेच सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये आम्ही 90 टक्के उमेदवार हे घड्याळाच्या चिन्हावर उभे केले आहेत. ही चर्चा झाल्याशिवाय आम्ही असा निर्णय घेतला असेल का? अजित पवार स्वत: म्हणाले होते की मी माझ्या पक्षातील सर्वांशी बोललो आहे. एकत्र येण्याचा माझा निर्णय आहे आणि तो सर्वांना मान्य होईल. त्यांच्या गटाचे नेते आता वेगळे बोलत आहेत. वास्तविक दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रिकरणाचा प्रयत्न करणारा व्यक्तीच राहिला नाही, हे दुर्दैव आहे. आता त्यांच्या पक्षाकडून काय भूमिका मांडली जातेय हे महत्वाचे आहे, नंतरच पुढील धोरण ठरवले जाईल, असेही आ. शिंदे यांनी सांगितले.