शशिकांत शिंदे File Photo
सातारा

Shashikant Shinde | आ. शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्षपदाच्या रेसमध्ये

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात वेगाने राजकीय हालचाली

पुढारी वृत्तसेवा

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळणारे आ. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. आता नवीन अध्यक्षाची चाचपणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीची दोन शकले झाल्यानंतर आ. शशिकांत शिंदे यांनी थोरल्या पवारांसोबत राहून मूळ पक्षाची पडझड थांबवण्यासाठी जीवाचे रान केले.

या लढाऊ नेत्याच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ घातली जावी, यासाठी पक्षातील प्रमुख कार्यकर्ते आग्रही आहेत. या परिस्थितीत पश्चिम महाराष्ट्र प्रभारी पदावरुन थेट प्रदेशाध्यक्षपदावर आ. शशिकांत शिंदे यांचे ‘प्रमोशन’ होणार अशा राजकीय चर्चेला उधाण आल्याने आ. शिंदे यांना मानणार्‍या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित प्रमुख कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या भविष्यातील दिशा, नव्या नेतृत्वाची गरज आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी स्पष्ट आणि प्रभावी भूमिका मांडली. तसेच माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरुन दूर होण्याबाबत दिलेले संकेत आणि त्यानंतर नवीन नेतृत्व पक्षाला कधी मिळणार याबाबत शरद पवार यांनी केलेले भाष्य भलतेच चर्चेत आले आहे.

पक्ष म्हणजे संघटना आहे आणि या संघटनेच्या कामाला गेल्या 8-10 वर्षांत जयंत पाटील यांनी प्रामाणिकपणे वाहून घेतले, मात्र आ. जयंत पाटील यांनी स्वतः नव्या पिढीला संधी दिली पाहिजे, अशी माझ्याकडे मागणी केली आहे. परंतु पक्षाच्या काही कार्यकर्त्यांची मानसिकता वेगळी आहे. यासंदर्भातील कोणताही निर्णय सामूहिक विचारांतीच घेतला जाईल, असे स्पष्टीकरण खा. शरद पवार यांनी याच कार्यक्रमात केले.

याशिवाय पुढच्या तीन महिन्यांत होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करुन, महिलांच्या प्रतिनिधित्वावर भर द्यायचा आहे. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात नव्या नेतृत्वाचा विचार केला जाईल. प्रत्येक तालुका, जिल्ह्यात नवे चेहरे दिसले पाहिजेत. पक्षात हजारो कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यातून राज्य चालवण्याचं नेतृत्व घडू शकतं, असे देखील शरद पवार यांनी स्पष्ट केले होते.

आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर निश्चितपणे प्रदेशाध्यक्ष बदल होण्याची चिन्हे आहेत. संघर्षाच्या वातावरणातच राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आहे. 1999 मध्ये खा. शरद पवार यांनी काँग्रेसपासून फारकत घेत या नव्या पक्षाची स्थापना तब्बल 26 वर्षांपूर्वी केली होती. तेव्हा दिवंगत खा. लक्ष्मणराव पाटील, विधानपरिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर आणि आ. शशिकांत शिंदे या सातारच्या प्रमुख नेत्यांनी पवारांना मोठी साथ दिली. आ. शिंदे यांनी तर प्रभावी वक्तृत्व आणि राजकीय धुरंधरपणा दाखवून संपूर्ण जिल्ह्यावर राष्ट्रवादीचा प्रभाव निर्माण केला. या तीन नेत्यांच्या राजकीय कौशल्यांमुळे सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती, जिल्हा बँक, विकास सेवा सोसायट्यांवर राष्ट्रवादीचाच प्रभाव राहिला. आ. शशिकांत शिंदे यांचा सातार्‍यासोबतच नवी मुंबईवर देखील मोठा राजकीय प्रभाव आहे. लढाऊ माथाडी नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सत्ता नसतानाही या नेत्याने खा. शरद पवार यांची साथ सोडली नाही. तसेच मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये आपला राजकीय प्रभाव त्यांनी दाखवून दिला आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी आरोग्य मंत्री आ. राजेश टोपे, आ. रोहित पवार यांचीही नावे चर्चे असली तरी आ. शशिकांत शिंदे यांचे नाव मात्र, आघाडीवर आहे.

मुलुखमैदानी तोफ महाराष्ट्रभर गरजणार...

सातारा व नवी मुंबईमध्ये राजकीय प्रभाव असलेल्या आ. शशिकांत शिंदे हे धाडसी राजकारणी असून, पवारांच्या शब्दाखातर जावली हा सुरक्षित मतदारसंघ सोडून ते कोरेगावातून निवडून आले होते. शिंगावर घेण्याची तयारी आ. शिंदे यांनी अनेकदा दाखवल्याने त्यांना राष्ट्रवादीची मुलुखमैदान तोफ संबोधले जाते, हीच तोफ राज्यभर गरजण्याच्या तयारीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT