शशिकांत शिंदे File Photo
सातारा

Shashikant Shinde | नुकसानग्रस्तांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्या : आ. शशिकांत शिंदे

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पुनर्बांधणी करणार

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्यातील फलटण, माण, खटाव तालुक्यांसह इतर तालुक्यांमध्ये मे महिनाअखेरीस झालेल्या वळवाच्या पावसामुळे पिकांसह शेतीचेही नुकसान झालेले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये इतकी मदत द्यावी. 3 हेक्टरऐवजी 2 हेक्टर क्षेत्राचा निकष तत्काळ रद्द करावा. शेतकर्‍यांना कधीपर्यंत ही मदत करणार, हे सरकारने जाहीर करावे. अन्यथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा आ. शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

आ. शिंदे म्हणाले, मागील वर्षी पावसाने झालेल्या नुकसानीची मदत अद्यापही दिली गेलेली नाही. मी विधीमंडळात लक्षवेधी मांडल्यानंतर 50 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र, केवळ राजकारणाच्या हेतूने सरकारने हे पैसे वापरले नाहीत. त्यामुळे नुकसानरपाई दिली जाईल की नाही याची शंकाच आहे. त्यामुळे सरकारविरोधात आम्ही हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार आहोत.आदिवासी विभाग, समाजकल्याण विभाग यांचा निधी इतरत्र वळवण्यात आला आहे. त्यामुळे सरकारकडे पैसा राहिलेला नाही, अशी टीकाही केली.

आ. शशिकांत शिंदे म्हणाले, विधानसभा निवडणुकीआधी सत्ताधारी महायुतीने आमदार निवडून आणण्यासाठी रस्त्याची कामे मंजूर केली. ही सर्वच कामे अत्यंत वाईट पध्दतीने सुरु आहेत. शेंद्रे ते कागल या रस्त्याच्या कामामुळे वाहनधारकांचा कोंडमारा होत आहे. या रस्त्याच्या कामाची मुदत संपली आहे. यामुळे आता संबंधित ठेकेदाराने मुंबई, उत्तर प्रदेश, गुजरात येथील कंत्राटदारांना बोलावून शेंद्रे ते पेठनाका या रस्त्यावरील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. दै. ‘पुढारी’ने याबाबत माहिती उघडकीस आणली आहे.

दरम्यान, या रस्त्याच्या कामाची मुदत संपली असताना संबंधित ठेकेदाराला काय दंड करण्यात आला? याचा खुलासा होणे जरुरीचे आहे. राष्ट्रवादीचे नवे, जुने कार्यकर्ते एकत्र करुन पक्षाची पुनर्बांधणी करणार आहे. पक्षबांधणीसाठी प्रयत्न सुरु आहेत. येत्या एक ते दीड महिन्यात हे काम पूर्ण होईल. आम्ही शून्यातून पुन्हा उभे राहू, असेही आ. शिंदे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT