सह्याद्री साखर कारखान्यावरील लग्न सोहळ्यात खा. उदयनराजेंनी खा. शरद पवार यांना पुष्पगुच्छ भेट देत संवादही साधला. Pudhari Photo
सातारा

Sharad Pawar Udayanraje Meeting | शरद पवार-उदयनराजे यांच्यात ‘साखर’ पेरणी; लग्न सोहळ्यात भेट

‘सह्याद्री’वर खिलाडूवृत्ती; परिपक्व राजकारणाचे घडले दर्शन

पुढारी वृत्तसेवा

सातारा : यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर शुक्रवारी पार पडलेल्या एका लग्न सोहळ्यात राजकीय गाठीभेटींचा एक नाट्यपूर्ण अध्याय पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. शरद पवार यांची भाजपचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली. गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी आ. शशिकांत शिंदे यांच्याशीही खा. उदयनराजेंनी गप्पा मारल्या.

माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मुलाच्या लग्नसोहळा समारंभाच्या निमित्ताने राज्यभरातील मातब्बर नेत्यांनी उपस्थिती लावली होती. राष्ट्रवादीच्या दोन्ही पवार गटाच्या नेत्यांची यावेळी चर्चा सुरू होती. भाजपचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. शरद पवार यांची पुष्पगुच्छ देऊन सदिच्छा व्यक्त केल्या आणि दोघांमध्ये सुसंवादही झाला. मागील काही वर्षांपासून राजकीयदृष्ट्या समोरासमोर आलेले हे दोन्ही दिग्गज नेते अचानक एकत्र येताच राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला.

उदयनराजे हे भाजपचे खासदार असले तरी सातारा जिल्ह्यातील सामाजिक-राजकीय समतोल साधण्यासाठी त्यांच्या कृतीकडे नेहमीच राज्याचे लक्ष लागलेले असते. अशावेळी त्यांच्या हातून शरद पवार यांना पुष्पगुच्छ दिला जाणे हे परिपक्व राजकारणाचे उदाहरणच म्हणावे लागेल. लग्नसोहळा हे निमित्त असला तरी सातारा जिल्ह्याच्या राजकीय मंचावर पुन्हा एकदा चर्चेचा नव रंग चढला. विरोधात असलेले नेते एकत्र येणं, त्यांच्यात गप्पा रंगणं आणि राजकीय विभाजनाच्या पलिकडे वैयक्तिक स्नेह जपणं या गोष्टींनी सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील लवचिकतेचं आणि परिपक्वतेचं दर्शन घडवले. यावेळी मंत्री ना. मकरंद पाटील, आ. जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील आदि नेतेही उपस्थित होते.

उदयनराजे दिसताच पवारांनी केला सत्काराचा इशारा

शरद पवार व पृथ्वीराज चव्हाण शेजारी शेजारी बसले होते. तेवढ्यात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची नेहमीसारखी स्टायलीस एन्ट्री झाली. शरद पवारांसमोर येताच उदयनराजेंनी त्यांना नमस्कार केला. पवारांनीही त्यांचे हसून स्वागत केले. उदयनराजे समोर दिसताच शरद पवार यांनी बाळासाहेबांकडे इशारा करत उदयनराजेंना खुर्ची देऊन त्यांचा सत्कार करण्याचा इशारा केला. उदयनराजे व शरद पवार यांच्यात हास्यविनोद रंगले. त्यानंतर उदयनराजेंनी स्वत:हून आणलेला पुष्पगुच्छ खा. शरद पवारांना दिला आणि एकत्रित फोटोसेशनही केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT