सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खा. शरद पवार आजारपणातून सावरल्यानंतर शुक्रवारी साताऱ्यात दाखल होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. शासकीय विश्रामगृह परिसरात घोषणाबाजी, फुलांची उधळण आणि जल्लोषामुळे उत्साही वातावरण निर्माण झाले होते.
पवार यांच्या स्वागतासाठी जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीनेच साताऱ्यात असणारी खा. शरद पवारांची क्रेझ कायम असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला खा. शरद पवार भेटले. पवारांच्या भेटीचा आनंद कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वहात होता.
प्रकृती सुधारल्यानंतर पवार यांचा हा साताऱ्याचा पहिलाच दौरा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. अनेकांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले तसेच पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रतिभाताई पवार, खा. सुप्रिया सुळे, मंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आ. रोहित पवार, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, खा. नितीन पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, राष्ट्रवादी आयटीसी सेलचे अध्यक्ष सारंग पाटील, दीपक पवार, बाळासाहेब सोळस्कर, प्रभाकर देशमुख, अभयसिंह जगताप, राजकुमार पाटील, गोरखनाथ नलावडे, साहिल शिंदे, प्रवीण धस्के यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पवार यांनी उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधत सर्वांच्या शुभेच्छांबद्दल आभार मानले. जिल्ह्यातील विविध प्रश्न, अडचणी आणि निवेदनेही त्यांनी शांतपणे ऐकून घेत संबंधितांना आवश्यक सूचना दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.