सातारा : नवनवीन तंत्रज्ञानामुळे जग बदलत आहे. वेगवेगळे विचार आणि संकल्पना जागतिक पातळीवर रुढ होत असताना या सर्व संकल्पनांना समांतर शैक्षणिक व्यवस्था उभी करण्याचे काम रयत शिक्षण संस्थेच्या वतीने केले जात आहे. जगातील नामवंत विद्यापीठांशी समन्वय साधून रयतच्या विद्यार्थ्यांचा सुसंवाद वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कर्मवीर अण्णांचा त्याग आणि दूरदृष्टी घेऊन संस्थेचा विस्तार अधिक व्यापकपणे सुरू आहे. आज रयत शिक्षण संस्थेची जी उंची वाढली याचे श्रेय रयत शिक्षण संस्थेतील सेवकांना जाते, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.
सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 67 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी खा. सुप्रिया सुळे, खा. धैर्यशिल मोहिते, आ. दिलीप वळसे-पाटील, आ. डॉ. विश्वजित कदम, आ. शशिकांत शिंदे, आ. रोहित पवार, आ. परेश ठाकूर, आ. चेतन तुपे, आ. आशुतोष काळे, माजी आमदार बाळासाहेब पाटील, व्हा. चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, रामशेठ ठाकूर, मीनाताई जगधने, जयश्रीताई चौगुले, सरोज पाटील, महेंद्र लाड, ॲड. रवींद्र पवार, ॲड. दिलावर मुल्ला, जे. के. जाधव, शकुंतला ठाकूर, कर्मवीर कुटुंबीय उपस्थित होते.
खा. शरद पवार म्हणाले, कर्मवीर अण्णांनी अतिशय कष्टाने, त्यागाने आणि दूरदृष्टी ठेवून शेवटच्या घटकातील विद्यार्थ्यांना ज्ञानाचे दरवाजे खुले व्हावेत, म्हणून रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. हाच त्यांचा आदर्श आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. 742 शाखा असलेल्या रयत शिक्षण संस्थेचा विस्तार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत झाला आहे. सव्वा चार लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. थोर देणगीदारांमुळे ऊर्जा वाढते, संस्थेला अधिक वृद्धिंगत करण्यासाठी यापुढेही शैक्षणिक धोरणात्मक बदल करून निर्णय घेतले जातील. जगभरातील बोस्टन, ऑक्सफर्ड या नामवंत विद्यापीठाशी समन्वय साधून रयत शिक्षण संस्था प्रगती करणार असून, सर्वांनी त्यास साथ द्यावी, असे आवाहन खा. पवार यांनी केले.
प्रास्तविक संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले. संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध मासिकांचे प्रकाशन करण्यात आले. उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे व डॉ. सविता मेनकुदळे यांनी सूत्रसंचलन केले. माध्यमिक विभागाचे सहसचिव बी. एन. पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, जनरल बॉडी सदस्य, लाईफ मेम्बर, लाईफ वर्कर, शाखांचे शाखाप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.