सातारा : दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत सुप्रिया सुळे व अजित पवार हे निर्णय घेतील असे सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खा. शरद पवार यांनी केल्यानंतर जोरदार घडामोडींना वेग आला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गुरूवारी रात्री सातार्यात आलेल्या शरद पवारांची राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भेट घेतली.
अजितदादाही शुक्रवारी सकाळी सातार्यात दाखल होणार असून रयतच्या व्यासपीठावर शरद पवार - अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याने राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा वेग आला आहे. शरद पवारांचे सुतोवाच आणि रात्रभर सुरू असलेल्या खलबतांचा ऊत यामुळे राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची चर्चा वेगाने सुरू आहे.
पत्रकारांशी अनौपरिक बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत सुतोवाच केले. त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा एकच आहे. त्यामुळे पक्षातील काहीजणांना आम्ही एकत्र यावे असे वाटते. मात्र, याबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे व अजितदादा घेतील, असे पवार म्हणाल्याचे सांगितले जाते. पवारांच्या सुतोवाचानंतर शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनीही त्याच दिशेने विधाने केली आहेत.
राज्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातून याबाबत प्रतिक्रिया सुरू असतानाच गुरूवारी सायंकाळी शरद पवार सातार्यात दाखल झाले. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची शुक्रवारी पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येलाच शरद पवार सातार्यात दाखल झाले. शासकीय विश्रामगृहावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते व पदाधिकार्यांनी त्यांची भेट घेतली. गेले महिनाभर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. शशिकांत शिंदे यांनी तालुकावार दौरे केले होते. या सर्व पदाधिकार्यांना आ. शिंदे यांनी शरद पवार यांना भेटवले. खा. धैर्यशिल मोहिते-पाटील, खा. निलेश लंके, आ. शशिकांत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आ. चेतन तुपे, अभिजीत काळे, सुनील माने, राजकुमार पाटील, दिपक पवार, रणजितसिंह देशमुख, शहाजी क्षीरसागर, अविनाश मोहिते यांनी शरद पवारांशी चर्चा केली.
महिला पदाधिकार्यांनीही शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेची बैठक शरद पवारांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीला आ. दिलीप वळसे-पाटील, आ. विश्वजीत कदम हेही उपस्थित होते.
एकीकडे माध्यमांमध्ये व सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या सुरू असलेल्या बातम्या व दुसरीकडे सातारच्या शासकीय विश्रामगृहावर शरद पवारांना भेटायला येणारे खासदार, आमदार व पदाधिकारी यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या चर्चेला वेग आला. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील हेही रात्री उशीरा शरद पवारांना भेटले. या भेटीचा तपशील बाहेर आला नाही.
रयत शिक्षण संस्थेच्या व्यासपीठावर शरद पवार व अजित पवार एकत्र येतातच. मात्र, शरद पवारांच्या सातार्यात येण्यानंतर खा.निलेश लंके, खा. धैर्यशिल मोहिते-पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यांना सातार्यात येवून भेटून जातात यात अनेक अर्थ दडले आहेत. त्यामुळे एकीकरणाच्या चर्चांना आलेला वेग न थांबणारा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार हेही रात्री उशीरा सातार्यात दाखल होणार होते. मात्र, शुक्रवारी सकाळी ते कर्मवीर समाधी स्थळावर असणार आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत होणार्या या पुण्यतिथी सोहळ्यात व त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला शरद पवारांच्यासोबत अजितदादांची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे दोघांच्या एकत्र येण्याच्या चर्चा आणखी वेगवान होणार आहेत. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकीकरणाचे वाहू लागलेल्या वार्याचा केंद्रबिंदू मात्र पुन्हा एकदा सातारा झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर हे सातारा सर्किट हाऊसबाहेर राष्ट्रवादीचे नेते अजितदादांच्या स्वागतासाठी हातात बुके घेवून उभे होते. मात्र, अचानकपणे शरद पवार यांच्या गाड्यांचा ताफा आला. शरद पवारांना समोर पाहिल्यानंतर बाळासाहेब सोळस्करांनी हा बुके शरद पवारांना देत त्यांचे स्वागत केले. त्यावर पवारांनी मिश्किलपणे स्मितहास्य केले. मात्र, अजितदादांना आणलेला बुके शरद पवारांकडे पोहोचल्यामुळे एकत्रीकरणाच्या सुरू असलेल्या चर्चेत हाही धागा चर्चेला मिळाला.