Shambhuraj Desai Pudhari
सातारा

Shambhuraj Desai | जखमा बऱ्या होण्यासाठी जालीम औषधच लागते : ना. शंभूराज देसाई

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा परिषदेतल्या राजकीय संघर्षावर सूचक भाष्य केले

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्हा परिषदेत झालेली वादावादी आणि धक्काबुक्की महाराष्ट्राने पाहिली. मात्र, जिल्हा बँकेची निवडणूक अत्यंत शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचे नमूद करत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा परिषदेतल्या राजकीय संघर्षावर सूचक भाष्य केले. काही जखमा वरुन बऱ्या झाल्यासारख्या दिसतात; पण ज्या खोलवर असतात, त्या लवकर बऱ्या होत नाहीत. त्या बऱ्या होण्यासाठी थोडा उशीर लागतो आणि जालीम औषध घ्यावे लागते, असा सूचक टोला लगावत ना. शंभूराज देसाई यांनी आपल्‍या मनातील भावना व्‍यक्‍त केली.

जिल्हा बँकेत महायुतीचे पदाधिकारी निवडून आले असले, तरी बँकेच्या कामकाजात राजकारण आणले जाणार नाही, अशी भूमिका ना. देसाई यांनी मांडली. यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई, विलासकाका उंडाळकर, लक्ष्मणतात्या पाटील आणि भाऊसाहेब महाराज यांनी सहकार क्षेत्रात निर्माण केलेल्या परंपरेनुसार बँकेची प्रगती कायम ठेवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा बँक हे सहकाराचे मंदिर आहे. त्यामुळे राजकारणाचे जोडे बँकेच्या बाहेर ठेवून सर्वांनी एकत्रितपणे सहकाराच्या विकासासाठी काम केले पाहिजे. बँकेच्या माध्यमातून शेतकरी, सभासद आणि सहकार क्षेत्राच्या हिताला प्राधान्य दिले जाईल, असेही ना. शंभूराज देसाई यांनी सांगितले.

पदे दोनच होती, कोणताही फॉर्म्युला नाही

जिल्‍हा बँकेत महायुती एकत्रित लढली. मात्र, दोनच पक्षांना अध्‍यक्ष, उपाध्‍यक्षपदाचा फायदा झाला, याबाबत विचारले असता ना. देसाई यांनी पदे दोनच होती, म्‍हणजे ती दोनच पक्षांना मिळणार ना... अशा शब्‍दांत कोपरखळी मारली. तर निवड आता झालीय, कोणताही फॉर्म्युला नाही बाकीच्‍या चर्चा नंतर होतील, असेही सूचक वक्‍तव्‍य त्‍यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT