Shambhuraj Desai (File Photo)
सातारा

Shambhuraj Desai | उपमुख्यमंत्री शिंदेंच्‍या आदेशानुसार भाजपला मदत करणार : मंत्री शंभूराज देसाई

महायुतीधर्म पाळण्‍याचे सेनेच्या सदस्‍यांना आवाहन

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांना विजयी करण्‍यासाठी शिवसेना पक्ष मदत करेल. महायुतीधर्म पाळण्‍याच्‍या सूचना शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्‍याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

देसाई म्‍हणाले, राज्‍यातील १७ जागांपैकी ६ जागा बिनविरोध निवडून आल्‍या आहेत. उर्वरित ११ जागांसाठी युतीतर्फे उमेदवार उभे आहेत. त्‍या सर्वांना निवडून आणण्‍याचा निर्णय झाला आहे. सातारा-सांगलीची जागाही निवडून आणायची आहे. शिवसेनेचे एकही मत इकडे-तिकडे जाता कामा नये. सर्वांनी कदम यांना मतदान करण्‍याचे आदेश दिले आहेत. सगळ्या सदस्‍यांच्‍या शंका निरसन करण्‍याची जबाबदारी पालकमंत्री म्‍हणून माझ्‍यावर दिली आहे. काही शंका राहिल्‍या, तरी त्‍या निवडणुकीनंतर एकत्रित सोडवू, अशा सूचनाही शिंदे यांनी दिल्‍याचे देसाई यांनी सांगितले.

मंगळवारी पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती तसेच नगरपालिका व नगरपंचायतींच्या सदस्यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, कराडचे नगराध्‍यक्ष राजेंद्रसिंह यादव, संपर्क नेते शरद कणसे, अनिकेतराजे नाईक निंबाळकर, राजाभाऊ बर्गे, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, रणजितसिंह भोसले, जयवंत शेलार, एकनाथ ओंबळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत सदस्यांनी भावना तीव्र शब्दांत व्यक्त केल्या. तसेच पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो मान्य करून त्याची अंमलबजावणी करण्याची भूमिका सदस्यांनी मांडली. तासभर चाललेल्या बैठकीत सर्वांची मते जाणून घेतली असून त्याचा अहवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठविला जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. बैठकीनंतर ना. देसाई पत्रकारांशी संवाद साधताना म्‍हणाले, माझ्याशी वैयक्तिकरीत्या कोणत्याही भाजप नेत्याने संपर्क साधलेला नाही; मात्र शिंदेसाहेब जो आदेश देतील, त्यानुसार शिवसेनेचे एकही मत बाजूला जाणार नाही. निर्णय घेताना भविष्यात कोणतेही परिणाम भोगावे लागू नयेत, याचीही काळजी घेतली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT