सातारा : पाटण विधानसभा मतदारसंघाबाबत मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेली भाषा अहंपणाची असून त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पाटणकर गटाच्या 102 गावांमधील 1966 प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ना. गोरे यांनी निवडणूक काळात कुठलेही पॅकेज जाहीर केले तरी पाटणची जनता भूलणार नाही, असा पलटवार पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्री गोरे यांच्यावर केला. दरम्यान, झेडपी निवडणुकीसंदर्भात भाजपकडून कोणताही प्रतिसाद नसल्याने शिवसेना येत्या दोन दिवसांत आपला निर्णय जाहीर करणार असल्याचेही ना. देसाई यांनी म्हटले आहे.
ना. शंभूराज देसाई म्हणाले, पाटणच्या जनतेने मला तीस हजारच्या मताधिक्याने निवडून दिले आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आम्ही विकासकामांच्या जीवावर निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. त्यामुळे जनता विकास कामे बघून आमच्या पाठीशी राहील. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पालकमंत्री या नात्याने मी महायुतीतील घटक पक्षांची युती घडवून आणण्याचा प्रयत्न केला, मात्र नगरपालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये देखील भाजपकडून बिलकुल प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसात शिवसेना आपली भूमिका स्पष्ट करेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
ना. देसाई म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये महायुती मधील घटक पक्षांची युती करण्यासंदर्भात बैठक घेण्यासाठी मी पुढाकार घेतला होता. ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील पालकमंत्र्यांनी बैठक घ्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार मी दोन दिवसांपूर्वी भाजपचे आमदार, खासदार आणि दोन्ही मंत्र्यांना निमंत्रण पाठवले होते. मात्र या बैठकीला भाजपचे दोन्ही मंत्री आले नाहीत. भाजपने केवळ माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना चर्चेसाठी पाठवले होते. त्यांच्याशी चर्चा झाली मात्र निवडणुकीतील युतीचा निर्णय भाजपचे मंत्री आणि खासदार, आमदार यांना विचारून घेऊ, असे त्यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीतदेखील आम्हाला हाच अनुभव आलेला आहे. पालकमंत्री म्हणून मी युती करण्यासंदर्भात बैठकीबाबत भाजपच्या नेत्यांना निमंत्रण पाठवले होते. केवळ जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले त्यावेळी बैठकीला आले मात्र त्यांनी देखील आमदार , मंत्री यांना विचारून निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले होते. दोन वेळचा अनुभव पाहता भाजपकडून युती संदर्भात कोणताही प्रतिसाद मिळत नाही. आता शिवसेना म्हणून आमचे पदाधिकारी एकत्र बसून पुढील रणनीतीसंदर्भात निर्णय घेतील, असेही ना. देसाई यांनी स्पष्ट केले आहे.