शंभूराज देसाई  File Photo
सातारा

ना. शंभूराज देसाई सातारचे पालकमंत्री

ना. शिवेंद्रराजे लातूरचे, ना. जयकुमार सोलापूरचे तर ना. मकरंद पाटील बुलढाण्याचे पालकमंत्री

पुढारी वृत्तसेवा

सातारा : महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटप होऊन सुमारे महिनाभराच्या कालावधीनंतर शनिवारी पालकमंत्रिपदाची अधिकृत यादी जाहीर झाली. त्यामध्ये सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी ना. शंभूराज देसाई यांची दुसर्‍यांदा वर्णी लागली तर ना. शिवेेंद्रराजे भोसले यांच्याकडे लातूर, ना. जयकुमार गोरे यांच्याकडे सोलापूर, ना. मकरंद पाटील यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

महायुती सरकार स्थानापन्न झाल्यानंतर पालकमंत्रिपदाबाबत राज्यात औत्सुक्य निर्माण झाले होते. अनेक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाबाबत रस्सीखेचही सुरू होती. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार? याची उत्सुकता होती. अखेर शनिवारी राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. गतवेळच्या सरकारमध्येही ना. शंभूराज देसाई सातार्‍याचे पालकमंत्री होते. आता सलग दुसर्‍यांदा त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.

राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदी पहिल्यांदाच विराजमान झालेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या खांद्यावरही राज्यातील तीन जिल्ह्यांच्या पालकत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. ना. शिवेंद्रराजे यांना लातूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले आहे. ना. जयकुमार गोरे यांना लगतच्याच सोलापूर जिल्ह्याचे तर ना. मकरंद पाटील यांना बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले. जिल्ह्यातील मंत्री झालेल्या चारही सुपुत्रांकडे पालकमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ना. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

नव्या पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण

रविवार दि. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या आधी पालकमंत्रिपदाची घोषणा होणार का? याबाबत जनतेमध्ये उत्सुकता होती. शनिवारी ही उत्सुकता पालकमंत्री निवडीनंतर थांबली. आता सातारा जिल्ह्यात ना. शंभूराज देसाई, लातूरमध्ये ना. शिवेंद्रराजे भोसले, सोलापुरात ना. जयकुमार गोरे, बुलढाणा येथे ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT