Shambhuraj Desai | भाजपकडून लोकशाहीचा खून : शंभूराज देसाई Pudhari
सातारा

Shambhuraj Desai | भाजपकडून लोकशाहीचा खून : शंभूराज देसाई

मंत्र्यांना जखमी केले जात असेल तर भाजपची किती ही मग्रुरी?

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्हा परिषदेत घडलेली घटना जिल्ह्याच्या इतिहासाला काळिमा फासणारी आहे. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत पक्षादेशाचे उल्लंघन करणाऱ्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यात येणार असून त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी आहे. या निवड प्रक्रियेत भाजपने लोकशाहीचा खून केला. मंत्र्याला जर जखमी केले जात असेल, धक्काबुक्की केली जात असेल तर किती ही दादागिरी, किती मग्रुरी, किती सत्तेचा माज? भाजपच्या घरगड्यासारखं वागणाऱ्या प्रशासनाचा जाहीर निषेध करतो.

या प्रकरणाची सुरुवात भाजपने केली असली तरी त्याचा शेवट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस करेल. यंत्रणा बटिक झाल्याने जिल्हा प्रशासनाविरोधात कोर्टात जाऊन केस दाखल करणार करणार, असा इशारा पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी खा. नितीन पाटील, माजी आमदार दीपक चव्हाण, माजी जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, बाळासाहेब सोळस्कर आदी प्रमुख उपस्थित होते.

ना. शंभूराज देसाई म्हणाले, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीची निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रपणे लढवली. आमच्यासमोर भाजपचे उमेदवार होते. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी आमचे बहुमताइतके 33 सदस्य जिल्हा परिषदेत घेऊन गेलो. अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर सदस्यांना इमारतीत घेऊन जात असताना लिफ्टपासून चौथ्या मजल्यापर्यंत सुमारे 200 पोलिस साध्या वेशात होते. आमचे सदस्य बापूसाहेब शिंदे यांचे आमच्याच सदस्यांनी अपहरण केल्याबद्दल शुक्रवारी सकाळी खोटी तक्रार पोलिसांनी दाखल केली. गुरुवारीही खोटी तक्रार दाखल केली होती. त्यांनी याबाबत स्टेटमेंटही दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य व इतर दोन कार्यकर्त्यांची पोलिसांनी तक्रारीत नावे घातली. सदस्य कामेश कांबळे यांना मी व मकरंदआबा सभेच्या ठिकाणी घेऊन निघालो असता त्यांना शिवेंद्रराजेंनी अडवले. मी आबा आणि दादांसोबत जाणार असल्याचे कामेशने शिवेंद्रराजेंना स्पष्ट सांगितले. तरीही शिवेंद्रराजेंनी त्याला दम दिला. शिवेंद्रराजेंबरोबर सातारचे नगराध्यक्ष मोहिते आणि फिरोज पठाण हेही होते. या तिघांनी माझ्या मिठीतून सोडवून कामेशला उजव्या बाजूच्या व्हरांड्यात नेले. त्यांच्या मिठीतून कामेशला सोडवून मी व आबांनी त्याला चौथ्या मजल्यावर नेले. कामेश सभागृहात आमच्या सदस्यांमध्ये जाऊन बसले.

दुसऱ्या दोन सदस्यांना आणण्यासाठी शशिकांत शिंदे व मी खाली गेलो. मात्र बसमधील सदस्यांना पोलिस आत सोडत नसल्यामुळे आ. शिंदे यांना तिकडे जावे लागले. त्यानंतर मी सदस्य संदीप मांडवे आणि अनिल देसाई यांना घेऊन आलो. त्यावेळी लिफ्टजवळ साधारण शंभर पोलिस साध्या वेशात उभे होते. सभागृहाच्या दरवाजाजवळ मी आणि आबा गेलो असता पोलिसांनी काठ्या आडव्या लावून आम्हाला मागे ढकलले. दहा-दहा पोलिस एकेका सदस्याला ओढत होते. मंत्री आहेत, असे मांडवे सांगत असतानाही पोलिसांवर काहीही परिणाम झाला नाही. त्या झटापटीत माझ्या हाताला जखम झाली. तरीही मांडवे आणि देसाई यांना आम्ही सभागृहापर्यंत नेले. आम्ही पोलिसांना भारी पडू लागलो त्यामुळे साध्या वेशातील आणखी पोलिस आले. त्यांनी आम्हाला ओढले. दोन्ही सदस्यांना पोलिस घेऊन गेले,असे ना. शंभूराज देसाई यांनी सांगितले.

ना. शंभूराज देसाई म्हणाले, लोकांनी 37 मतांचा कौल आमच्या बाजूने दिला होता. निवडणूक झाल्यानंतर आम्ही एकत्र आलो नव्हतो, दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेनेने निवडणूकपूर्व युती केली होती. या निवडणुकीत 37 सदस्य निवडून आले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व शिवसेनेच्या प्रत्येकी दोन सदस्यांनी व्हीपचे उल्लंघन केले. त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई केली जाईल. सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावे लागले तरी आम्ही पाठपुरावा करणार आहे. तुमचे सदस्यत्व जावू देत नाही, असे काहीजणांनी त्यांना सांगितले असले तरी आज शासन त्यांचं जसं मांडलिक झालं, भाजपच्या घरगड्यासारखं प्रशासन वागलं मात्र न्यायदेवता आम्हाला न्याय देईल. पक्षादेशाचे उल्लंघन करणाऱ्या सदस्यांवर कोर्टाच्या माध्यमातून कारवाई करणार, असा इशारा ना. शंभूराज देसाई यांनी दिला.

ना. शंभूराज देसाई म्हणाले, आमचे बहुमत असलेले 33 सदस्य मतदान करायला निघाले असताना त्यांना त्यांच्या हक्कापासून रोखले. मतदानापासून कोणालाही रोखले जावू शकत नाही. जिल्हा परिषदेत मतदानाच्या ठिकाणी उंबरठ्यावर आलेल्या सदस्यांना पोलिसांनी ओढून नेले आहे. त्यांनी लोकशाहीचा खून केला. मंत्र्याला जर जखमी केलं जात असेल, मंत्र्यांना धक्काबुक्की केली जात असेल तर किती ही दादागिरी, किती मग्रुरी, किती सत्तेचा माज? आम्हीही त्या सरकारमध्ये आहोत. आम्ही मंत्री असलेल्याचंही पोलिसांना भान नाही. भारतीय जनता पक्षाचं मांडलिकत्व पत्करल्यासारखं पोलिस वागले आहेत. जिल्हा प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध व धिक्कार करत आहे. या प्रकरणाची सुरूवात भाजपने केली असली तरी त्याचा शेवट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस करेल, असा इशारा त्यांनी दिला.

ना. शंभूराज देसाई म्हणाले, आम्ही बाहेर आलो त्यावेळी निवडून आलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर गुलाल होता. त्यांच्या चेहऱ्यावर सुतकी कळा होती. पण आमचे सदस्य पराभूत झाले असले तरी वाघासारखे ताठ मान करून बाहेर पडत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या विजयाच्या घोषणा देत होते. आमच्या हातात सत्ता असताना असले गलिच्छ राजकारण कधी केले नाही. यापूर्वी अनेक निवडणुका झाल्या. 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा उमेदवार उभा होता. माझ्या बंगल्यात आबा व माझ्या कशा मिनत्या केल्या? नाहीतर 2024 च्या लोकसभेचा निकाल काय लागला असता ते बघा, ते विसरला तुम्ही! लोकसभेला 34 हजारांनी भाजपची सीट निवडून आली. त्यावेळी मकरंद आबा आणि मी दहा-दहा फोन केले असते तर चित्र वेगळे दिसले असते. त्यावेळी आम्ही महायुती धर्म पाळला. त्याची अशी परतफेड भाजपकडून होणार असेल तर, ते चुकीचे आहे. घडलेला इतिवृत्तांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालणार आहे.

मकरंदआबाही सुनेत्रावहिनींना सर्व हकिकत सांगतील. शशिकांत शिंदेही शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी बोलतील. आगामी काळात जिल्ह्यात काय भूमिका घ्यायची, ते सर्वजण एकत्र बसवून ठरवणार आहोत. भाजपने नीचपणाचा कळस गाठला असून सत्तेची मस्ती कशी असते, हे दाखवून दिले आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे कृत्य भाजपने केले आहे. जिल्ह्यातील स्वाभिमानी जनता भाजपच्या या कृत्याचे उत्तर लोकशाही मार्गाने दिल्याशिवाय राहणार नाही. पोलिस घरगड्यासारखे वागले आहेत. या पोलिसांचे प्रमुख असलेले एसपी तुषार दोशी यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी आम्ही दोन्ही मंत्र्यांची आहे. मंत्रिमंडळात आम्ही हा विषय मांडणार आहोत, असा इशाराही ना. शंभूराज देसाई यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT