सातारा

राजधानीत शाही थाटात शिवजन्मोत्सव सोहळा

दिनेश चोरगे

सातारा; पुढारी वृत्तसेवा : राजधानी सातार्‍यासह अवघ्या जिल्ह्यात यंदा शिवजन्मोत्सव सोहळा शाही थाटात पार पडला. चौकाचौकात उभारलेल्या भगव्या स्वागत कमानी, भगव्या पताका, भगवे फेटेधारी शिवमावळे, भगवे झेंडे घेऊन शिवज्योतीबरोबर धावणारे शिवप्रेमी अशा भारावलेल्या वातावरणामुळे शाहूनगरीत तर अक्षरश: भगवे वादळ उठले. राजधानी सातार्‍यातील शिवतीर्थावर असणार्‍या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. 'जय भवानी जय शिवाजी', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'हर हर महादेव' अशा जयघोषांनी अवघा आसमंत दुमदुमला.

शिवजयंतीमुळे राजधानी सातार्‍यासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अमाप उत्साह दिसून येत होता. सोमवारी हा उत्साह शिगेला पोहोचला. सातारा शहरातील पोवई नाक्यावर शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिवप्रेमींनी रात्री 12 च्या ठोक्याला अभिवादन केले. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले मित्र समूह व आ. शिवेंद्रराजे भोसले मित्र समूह यांच्यासह विविध संस्था, संघटना व शिवप्रेमींनी शिवजयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजित केले.

राजवाडा तसेच पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला. सकाळी शिवप्रेमींनी शिवदौडीचे आयोजन करत किल्ले अजिंक्यतारा येथून पोवई नाका येथे शिवज्योत आणली. त्यानंतर श्रीमंत छत्रपती सौ. दमयंतीराजे भोसले यांच्याहस्ते शिवपुतळ्याला दुग्धाभिषेक व जलाभिषेक करण्यात आला. या जलाभिषेकासाठी जिल्ह्यातील पाच नद्यांचे पाणी कलशांमधून आणण्यात आले होते. या कलशांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महाआरती करण्यात आली. उदयनराजे भोसले मित्र समूहाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच विधिवत पूजनासह शंभरफुटी ध्वजस्तंभाचे अनावरण करण्यात आले.

ऐतिहासिक सातारा शहरात आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती महोत्सव समिती राजधानी सातारा यांच्यावतीने शिवजयंती मोहत्सव आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी शाही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत उंट, घोडे, केरळमधील शंभर वादकांचे पथक सहभागी झाले होते. गांधी मैदानावरून सुरू झालेली ही मिरवणूक पोलिस मुख्यालयामार्गे शिवतीर्थावर आली. तेथे आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्याहस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी केलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाला.

किल्ले प्रतापगडावरही शिवजयंती थाटामाटात साजरी झाली. जिल्हा परिषदेच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सीईओ याशनी नागराजन यांनी स्वत: या सोहळ्याला उपस्थित राहून छत्रपती शिवरायांना वंदन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातही शिवजयंती साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

शहरात अनेक ठिकाणी शिवराज्याभिषेक दिन, शिवजन्म आदी शिवकालावर आधारित चित्रांचे फलक झळकत होते. राजवाडा येथे सातारा नगरपालिकेच्यावतीने नवीन इमारतीमधील पालिका सभागृहात तसेच जुन्या इमारतीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. किल्ले प्रतापगड येथे विविध अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत विविध उपक्रमांनी शासकीय शिवजयंती साजरी झाली. लेक लाडकी अभियानाच्यावतीने अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली किल्ले अजिंक्यतारा येथे शिवाजी कोन होता पुस्तकाचे सामुहिक वाचन करण्यात आले.

शहरासह जिल्ह्यात विविध सार्वजनिक मंडळांनी राजगड, रायगड, शिवनेरी, प्रतापगड, वैराटगड, सिंहगड, अजिंक्यतारा, पन्हाळगड, विशाळगड, मुरुड-जंजिरा, सज्जनगड, पुरंदर यासह शिवस्पर्शाने पावन झालेल्या विविध किल्ल्यांवरून शिवज्योत दौडींचे आयोजन करण्यात आले होते. गावागावांतून येणारे शिवप्रेमी शिवतीर्थावर अभिवादन करुन शिवज्योत नेत होते.त्यामुळे शहर परिसरातील रस्त्यांवरुन शिवज्योती घेवून जाणारे मावळे धावताना दिसत होते. जिल्हा पोलिस प्रशासनाच्यावतीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

SCROLL FOR NEXT