सातारा : पुढारी वृत्तसेवा
आरे, ता. सातारा येथे शहीद कर्नल संतोष महाडीक यांच्या स्मृती उद्यानासाठी 37 गुंठे जमिन देण्यात येणार आहे. या ठिकाणी महसूल विभागाने त्वरीत भेट देवून जमिन मोजणी करुन द्यावी व सरकारी आदेश काढावा. शहीद कर्नल संतोष महाडीक स्मृती उद्यानाच्या जागेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
शहीद कर्नल संतोष महाडीक स्मृती उद्यानासाठी जागेचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या संदर्भात त्यांच्या मातोश्री कालिंदी महाडिक व चुलत बंधू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. त्यावेळी ना. देसाई म्हणाले, देशासाठी हौतात्म्य पत्करणार्या कर्नल संतोष महाडिक यांच्या मातोश्री स्वत: इतके वर्ष याबाबत पाठपुरावा करत आहेत.
यंत्रणेने हा विषय प्राधान्याने व संवेदशीलपणे मार्गी लावावा. त्याचबरोबर वॉर मेमोरियलला दि. 15 ऑगस्ट, दि. 26 जानेवारी व दि. 1 मे या दिवशी अभिवादन करण्याची प्रथा जिल्ह्यात सुरु करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.