सातारा : पिल्ले सोडून पसार झालेला मादी बिबट्या बांधकाम अर्धवट पडलेल्या इमारतीतच तळ ठोकून आहे. बुधवारी वनविभागाने दोन पिल्लांचे मादी बिबट्याशी पुनर्मिलन घडवून आणण्याचा वनविभागाने केलेला प्रयत्न सफल झाला नाही. बिबट्याने आपल्या दोन्ही बछड्यांना उचलून शेतात नेले व तेथेच सोडून रात्रीच्या काळोखात तो पसार झाला. दरम्यान, स्थानिकांना गुरुवारीही बिबट्याचे दर्शन घडले असून लोक बिबट्याच्या दहशतीमुळे घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत.
शाहूनगर येथील गुरुकुल स्कूलच्या मागील बाजूस एकनाथ रिसिडेन्सी व अर्धवट बांधकाम असलेली दुसरी इमारत आहे. याच इमारतीचा बिबट्याने आसरा घेतला आहे. विशेष म्हणजे ही पडकी इमारत ओलांडूनच एकनाथ रेसिडेन्सीमधील लोकांना जा-ये करावी लागत असल्याने बिबट्या कोणत्याही वेळी हल्ला करेल, अशी स्थानिकांना भीती आहे. तसेच पडक्या इमारतीच्या टाक्यांमध्ये, जिन्याच्या पायऱ्यांवर बिबट्या दिसून येत आहे. बुधवारी रात्री बिबट्याची दोन्ही पिल्ले वनविभागाने या परिसरात कॅरटमध्ये ठेवली होती.
मादी बिबट्याने रात्री ही पिल्ले उचलून नेली. पण पुढे शेतात टाकून ती पसार झाली. या परिस्थितीमध्ये ही पिल्ले वनविभागाने पुन्हा आपल्या ताब्यात घेतली होती. गुरुवारी रात्री पुन्हा त्याच ठिकाणी ही पिल्ले सोडण्यात येणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली. दरम्यान, लोकवस्तीमध्ये हा बिबट्या फिरत असल्याने त्याचा बंदोबस्त करण्यावर भर दिला जाईल, असेही सातपुते यांनी स्पष्ट केले आहे.