कराड : कौटुंबिक कलहामुळे अनेकदा नात्यांची वीण उसवते. मतमतांतरे निर्माण होऊन पती-पत्नीतील वादाच्या तक्रारी पोलिसांच्या कौटुंबिक विशेष कक्षात दाखल होतात. गत वर्षभरामध्ये दाखल झालेल्या अशा 93 तक्रारींचा निपटारा करुन कौटुंबिक विशेष कक्षाने पती-पत्नीतील सात जन्माच्या नात्याची वीण पुन्हा एकदा घट्ट केली आहे.
कराडात केंद्रीय समाजकल्याण मंडळ व भारतीय भटके विमुक्त संशोधन संस्था संचलित ‘कौटुंबिक विशेष कक्ष’ कार्यरत आहे. कौटुंबिक प्रश्न परस्पर चर्चेने व विश्वासाने सोडविणे, हा या कक्षाचा मुख्य उद्देश आहे़ मुळातच एखादा कौटुंबिक वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला तर त्यातून मतभेद वाढत जाऊन संसार तुटतात. पती-पत्नीसह मुलांमध्ये दुरावा निर्माण होतो. ही परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठीच पोलीस ठाण्यात येणाजया कौटुंबिक तक्रारी सुरुवातीला या कक्षाकडे वर्ग केल्या जातात. एप्रिल 2024 ते मार्च 2025 अखेर या कक्षात एकूण 138 तक्रारी दाखल झाल्या. त्यामधील 93 तक्रारी समुपदेशनातून निकाली काढण्यात आल्या असून संसार सावरले आहेत.
कौटुंबिक विशेष कक्षाकडे गत वर्षभरात एकूण 138 तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी बहुतांश तक्रारी पती-पत्नीतील वादाच्या होत्या. या तक्रारींपैकी 93 तक्रारींमध्ये समेट झाली असून, 14 तक्रारींवर अद्याप कार्यवाही सुरू आहे.
79 : कौटुंबिक हिंसाचार
12 : व्यसनाधिनता
5 : मुलांकडून होणारा त्रास
1 : दुसरा विवाह
2 : व्यक्तिमत्त्वातील दोष
8 : विवाहबाह्य संबंध
1 : संशयी स्वभाव
30 : पत्नीकडून होणारा त्रास
1) हिंसाचार 2) हेकेखोरपणा
3) संशयीवृत्ती 4) जोडीदाराकडून दुर्लक्ष
5) व्यसनाधिनता
कौटुंबिक विशेष कक्षाकडून समुपदेशनाबरोबरच कायदेशीर सल्ला व मदतही केली जाते़ तसेच तक्रारदारास तज्ज्ञ व्यक्तीकडून कायदेशीर सल्लाही दिला जातो.- सविता खवळे, समुपदेशक, कराड
काहीवेळा पती-पत्नीतील वादाचे कारण किरकोळ तर काहीवेळा गंभीर असते. मात्र, समुपदेशनातून त्यांचा संसार सावरण्याचा प्रयत्न केला जातो.- कोमल जाधव, समुपदेशक, कराड