सातारा : इयत्ता अकरावी प्रवेश भाग-1, भाग-2 तसेच अद्याप रजिस्ट्रेशन न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी दि. 22 मेपर्यंत मुदत होती. मात्र शनिवारीही वेबसाईट तांत्रिक अडचणीमुळे बंद पडली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑप्शन फॉर्म भरले जात नव्हते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आता पुन्हा दि. 25 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार प्रवेश भाग-1, भाग-2 तसेच अद्याप रजिस्ट्रेशन न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रक्रिया सुरू आहे. मात्र पहिल्याच दिवशी सकाळपासून वेबसाईट व्यवस्थित कार्यरत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑप्शन फॉर्म भरले जात नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक तणावाखाली होते. प्रवेश प्रकियेतील शिक्षकांनाही नाहक त्रास सहन करावा लागला. शनिवारी संकेतस्थळावर लोड येवून ती वारंवार बंद पडत होती. यामुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रिया विस्कळीत झाली होती.
ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी शनिवारी दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली असून आता प्रवेश प्रक्रियेचे सर्वच वेळापत्रक पुढे गेले आहे. दि. 26 मे रोजी जाहीर होणारी पहिली कटऑफ आता दि. 29 मे रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे.