कराड ः शंकरराव चांदे, प्रशांत चांदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी स्वागत केले. pudhari photo
सातारा

मलकापुरात काँग्रेसला खिंडार

Congress leadership crisis: काँग्रेस निष्ठावंतांचा भाजपमध्ये प्रवेश

पुढारी वृत्तसेवा

कराड : मलकापूर येथील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे मलकापूरचे माजी सभापती व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव चांदे आणि काँग्रेसचे मलकापूर शहराध्यक्ष प्रशांत चांदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे नेतृत्व स्वीकारत मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सतीश चांदे, धनाजी देसाई यांचाही भाजप प्रवेश झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, ना. अतुल सावे, आ. डॉ. अतुलबाबा भोसले, आ. समाधान आवताडे यांनी त्यांचे स्वागत केले.

ना. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, डॉ. अतुलबाबा भोसले हे कर्तव्यदक्ष आमदार आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांना गेल्या 20 वर्षांत काहीही विकास करता आलेला नाही. पण आ. डॉ. अतुलबाबांचा कामाचा धडाका पाहता, ते या 5 वर्षातच विकासाचा बॅकलॉग भरुन काढतील, असा मला विश्वास आहे. या कर्तव्य तत्परतेमुळेच आ. डॉ. अतुलबाबांचे नेतृत्व स्वीकारुन, कराड दक्षिणमधील अनेक नेते, पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या सर्वांचे मी स्वागत करतो. आणि येणार्‍या निवणुकीत नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा सर्वच ठिकाणी सर्व जागांवर भाजपा-महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करावेत.

मलकापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत चांदे हे मलकापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक असून, शिक्षण व नियोजन सभापती म्हणून कार्यरत होते. तर ज्येष्ठ नेते शंकरराव चांदे हे मलकापूर नगरपालिकेत तब्बल 15 वर्षे नगरसेवकपदी राहिलेले आहेत. यापैकी 10 वर्षे ते बांधकाम सभापती, तसेच शिक्षण व नियोजन सभापती म्हणून कार्यरत राहिले आहेत. नगरपालिका होण्यापूर्वी जवळपास 12 वर्षे ते मलकापूर ग्रामपंचायतीचे सदस्य होते. प्रशांत शिवाजी चांदे हे त्यांचे पुतणे आहेत. प्रशांत चांदे व शंकरराव चांदे यांचा भाजप प्रवेश राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांना जोरदार धक्का मानला जात आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपचे आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दारुण पराभव केला. विधानसभा निवडणुकीपूर्वीच मलकापूर नगरपालिकेचे काँग्रेसचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव यांच्यासह 4 माजी नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत, डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला होता. नुकताच काँग्रेसचे विंग जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकरराव खबाले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचे सुपुत्र आणि काँग्रेस नेते उदयसिंह पाटील हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT