सातारा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचे निधन

दिनेश चोरगे

भुईंज; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले (वय 90) यांचे रविवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात माजी आमदार मदन भोसले, मोहनराव भोसले, गजानन भोसले हे तीन सुपुत्र, विवाहित कन्या पद्मादेवी पाटील, सुना, नातवंडे, परतवंडेे असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याने मोठा नेता गमावला असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.

भुईंज गावचे सरपंच म्हणून प्रतापराव भोसले यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. यानंतर त्यांनी 1967 पासून 1985 पर्यंत सलग 4 वेळा वाई विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. या कालावधीत त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून राज्याचा कारभार हाकला. त्यानंतर ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या निधनाने रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदार संघातून 1984, 1989 व 1991 असे 3 वेळा संसदेत खासदार म्हणून प्रतिनिधीत्व केले. या काळात विविध राष्ट्रीय समित्यांवर महत्त्वपूर्ण जबाबदार्‍या पार पाडल्या. त्यानंतर त्यांनी 1997 साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि गेलेली सत्ता पुन्हा आणून महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार स्थापन करण्यात मोलाची कामगिरी बजावली.

आपल्या राजकीय कारकिर्दीत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, देशभक्त आबासाहेब वीर यांच्या नेतृत्वाखाली काम करताना धोम, कण्हेर धरण, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना, जनता शिक्षण संस्थेच्या उभारणीसह कृषी, सहकार क्षेत्रासह संस्थात्मक कामकाजात मोलाचे योगदान दिले. सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न, विचारांची पक्की बैठक आणि स्वाभिमान जपणारे नेतृत्व म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख होती. रविवारी सायंकाळी 4 वाजता प्रतापराव भोसले यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळ मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. यानंतर भुईंज येथे देगाव रस्त्यावरील त्यांच्या शेतात शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी खा. उदयनराजे भोसले, खा. श्रीनिवास पाटील, खा. रणजितसिंह ना. निंबाळकर, ना. शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. जयकुमार गोरे, माजी आमदार आनंदराव पाटील, सौ. प्रिया शिंदे, विशाल पाटील, शिवाजीराव महाडिक, नितीन भरगुडे-पाटील, शंकरराव गाढवे, प्रभाकर देशमुख, दीपक पवार, साहेबराव पवार उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT