सातारा : सातारा जिल्ह्यात उष्णतेची लाट सुरू आहे. गेल्या 10 दिवसांपासून जिल्ह्यावर सूर्याचे आग ओकणे सुरूअसल्याने भीषण उष्णता निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसेंदिवस रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद होत आहे. गेल्या 10 दिवसांत 40 अंश तापमानाचा चौकार झाला आहे. तर गुरुवारी रेकॉर्ड ब्रेक 40.7 अंशांवर सातार्याचा पारा होता.
सातारा जिल्ह्यात फेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यापासूनच तापमानात वाढ होत चालली आहे. सकाळी 9 वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात होत आहे. सायंकाळपर्यंत उन्हाच्या झळा बसत असल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकतोय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी नागरिक पुरते हैराण झाले आहेत. तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने सातारा शहरासह जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिक सकाळ व सायंकाळच्या वेळेतच कामानिमित्त बाहेर पडत आहेत. मात्र, कडक उन्हामुळे सकाळी 10 वाजल्यापासूनच रस्ते निर्मनुष्य होत आहेत.
यामुळे वर्दळीच्या रस्त्यासह गल्लोगल्ली शुकशुकाट जाणवत आहे. वाढत्या तापमानाचा मानवी आरोग्यावरही परिणाम होत आहे. गेल्या 8 एप्रिलपासून सातारा जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे. कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक ऊन अशा संमीश्र तापमानाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. गेल्या 10 दिवसांपासून तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. सतत वाढणार्या तापमानाचे जिल्ह्यात नवनवीन रेकॉर्ड नोंदवले जात आहेत. दि. 8 एप्रिल रोजी सातारचे कमाल तापमान 40.3 अंश तर महाबळेश्वरचे 23.0 अंशावर होते. तर दि. 15 रोजी सातारचे कमाल तापमान 40.3 अंश तर महाबळेश्वरचे 22.0 अंशावर होते. दि.16 रोजी सातारचे कमाल तापमान 40.2 अंश तर महाबळेश्वरचे 22.0 अंशावर होते. तर गुरुवार दि. 17 रोजी सातारचे कमाल तापमान 40.7 अंश तर थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणार्या महाबळेश्वरचे 22.6 अंशावर होते. त्यामुळे दहा दिवसाच्या कालावधीत सातार्याच्या तापमानाने चाळीशीचा चौकार मारला आहे. त्यामुळे मे महिन्यात तर आणखी भयावह परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे घरोघरी पंखे, एसी, कुलरचा वापर वाढला असला तरी नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत. उन्हाच्या चटक्यामुळे नागरिकांची शहर परिसरातील उद्याने, बागांमध्ये गर्दी झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तर नागरिकांनी थंडावा देणार्या पदार्थाकडे आपला मोर्चा वळवला आहे. कोल्ड्रींक्स हाऊस, शितपेये, हॉटेल्स, आईसस्क्रीम पार्लर, रसवंतीगृहामध्येही गर्दी वाढली आहे. तसेच बाजारात विविध रंगी टोप्या, सनकोट, वाळ्याच्या टोप्यांना मागणी वाढली आहे.