वेणेगाव : सातारा तालुक्यातील काशीळ येथील नागरिकांची धुळीने धूळधाण उडवली आहे. महामार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे व प्रचंड वाहतुकीमुळे सतत धूळ उडत असून त्यामुळे स्थानिक नागरिक, विक्रेते, व्यावसायिक व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. स्थानिकांना तर श्वसनाचे आजार जडले असून, या धुळीपासून सुटका होणार तरी केव्हा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
काशीळ हे महामार्गावरील मोठे गाव म्हणून ओळखले जाते. या परिसरात सध्या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावरून वळवल्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काशीळ-पाल रस्त्यादरम्यान वाहतुकीची मोठी वर्दळ असून या मार्गावरील डांबराचा थर पूर्णपणे निघाल्याने धुळीचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. विशेषतः माने वस्तीपर्यंतच्या परिसरात नागरिक, व्यापारी आणि प्रवाशांचे हाल होत आहेत.
एशियन महामार्गाच्या सहापदरीकरण कामाच्या निमित्ताने काशीळ - पाल रस्त्यादरम्यान या रस्त्याच्या अनुषंगाने साहित्याची अवजड वाहतूक सुरू आहे. त्यातच या रस्त्यावर वाहतुकीची नेहमीच वर्दळ असल्याने धुळीचा त्रास जादा आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यातूनही येथील नागरिकांना प्रवास प्रवास करावा लागत आहे.
पाल- खंडोबा- तारळेमार्गे पाटणकडे जाण्यासाठी काशीळ-तारळे रस्ता सोयीचा असल्याने येथे दिवसभर वाहतुकीचा ताण असतो. या सातत्यपूर्ण धुळीच्या त्रासामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी, विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. सातारा - कराड लेनवर काशीळ येथे बस थांबण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही. महामार्गावरील सुरू असलेल्या कामामुळे बसथांब्यास जागा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना उभे राहण्याची सुरक्षित जागाही नाही. काही दिवसांपूर्वी मालट्रक चालक अपघातात काशीळ येथे जागीच ठार झाला होता.
अपघात होऊ नये म्हणून व वाहनांची वेगमर्यादा कमी होण्यासाठी दोन्ही लेनवर गतिरोधक टाकण्यात आले होते. मात्र, या मार्गावर वाहतुकीची कोंडी व अपघातांची समस्या ही नित्याची बाब होत आहे. पुलाचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत शालेय विद्यार्थ्यांपासून महिलांपर्यंत सर्वांनाच मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
काशीळ येथील जुन्या गावठाण येथे राहणाऱ्या नागरिकांना पाल गावच्या बाजूकडे जाणाऱ्या रस्त्याकडे येताना काही प्रवासी विरुद्ध दिशेने प्रवास करत असल्याने अपघाताचा धोका वाढत आहे. सहापदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास भीषण अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. धुळीवर नियंत्रणासाठी पाणी फवारणी, रस्त्याची डागडुजी, बसथांब्याची तात्पुरती व्यवस्था अशा उपाययोजना त्वरित करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.