कराड : विज्ञान प्रदर्शन हे नवीन संकल्पनांना जन्म देणारे आणि त्या साकार करण्यासाठी प्रयत्नशील बनवणारे माध्यम आहे. या माध्यमातून भविष्यातील समस्या सोडवण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन कराड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बिपीन मोरे यांनी केले.
कराड तालुका 53 व्या विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे होते. यावेळी मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष सचिन नलवडे, डॉ. नामदेव हरळे, विजयकुमार माळवदे, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य नांगरे, शालेय पोषण आहार अधीक्षक नितीन जगताप, शिक्षण विस्तार अधिकारी जमिला मुलाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती कराड शिक्षण विभाग व सद्गुरु गाडगे महाराज प्राथमिक, माध्यमिक विद्यालय, रयत इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने 53 वे कराड तालुका विज्ञान प्रदर्शन सद्गुरु गाडगे महाराज विद्यालयाच्या प्रांगणात झाले.
बिपीन मोरे म्हणाले, जगासमोर असणाऱ्या भविष्यातील समस्या शोधा त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहा. समस्या विरहित जग निर्माण करण्यासाठी योगदान द्या.
धनंजय चोपडे म्हणाले, वर्गामधून असलेले बालवैज्ञानिक शोधून त्यांना दिशा देण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करा. यश अपयशाचा विचार न करता प्रयत्न करा. सचिन नलावडे यांनी तीनही दिवस विज्ञान प्रदर्शनामध्ये उपकरणे कायम ठेवावीत असे सुचवले. तर डॉ. नामदेव हराळे यांनी विज्ञान प्रदर्शन का आणि कशासाठी आयोजन केले जाते याची माहिती दिली. प्राथमिक माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. प्रदर्शनातील उपकरणांचे कौतुक ही केले. हे प्रदर्शन यशस्वीरित्या पार पडण्यासाठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तेजस राठोड, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सचिन पवार, इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका जयमाला शिर्के आणि शालेय पोषण आहार अधीक्षक नितीन जगताप यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रशांत शेटे व प्रियांका नालबंद यांनी केले. आभार शिक्षण विस्ताराधिकारी जमिला मुलाणी यांनी मानले.