सातारा : शहरी व ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचे संस्कार केंद्रे असणार्या अंगणवाड्या यांच्या कामकाजात एकसूत्रीपणा आणण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनांच्या शाळा, अंगणवाडी केंद्राचे छायाचित्रासह जिओ टँगिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील सर्व शाळाबाबतची माहिती केंद्र शासनाच्या युडायस प्लस या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मात्र यामध्ये गाव, चावड्या, वस्ती यांचे ठिकाण, लोकसंख्येची घनता, रस्ते, दोन शाळांमधील अंतर, शाळांच्या नजीक शासनाच्या इतर विभागांद्वारे उपलब्ध सोयीसुविधा याबाबतची माहिती शालेय शिक्षण विभागाकडे सध्य स्थितीत उपलब्ध नाही. त्यामुळे ही कमतरता भरून काढण्यासाठी एमआरएससी सोबत करारनामा करण्यात आला आहे.
त्यामुळे एमआरएससीकडे उपलब्ध विविध विभागांची माहिती, युडायस प्लस या संकेतस्थळावरील शालेय शिक्षण विभागाची माहिती यांचे एकत्रीकरण करून माहिती एका स्वतंत्र डॅश बोर्डवर उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे या माहितीचा उपयोग शालेय शिक्षण विभागास संबंधित विविध योजनांच्या आखणी आणि अंमलबजावणीसाठी होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
एमआरएसएसीद्वारे सर्व शाळा, अंगणवाडी केंद्राचे मॅपिंग अक्षांश व रेखांशासह करण्याची प्रक्रिया मोबाईल अॅपद्वारे करण्यात येणार आहे. त्यात विविध विभागामार्फत कार्यरत सर्व शाळा तसेच अंगणवाड्याबाबतची माहिती संकलित करण्यात येणार आहे.
जिओ टॅगिंग म्हणजे फोटो, व्हिडीओ, वेबसाईट किंवा इतर माहितीला भौगोलिक स्थान जोडणे, यात अक्षांश आणि रेखांश वापरून माहितीच्या ठिकाणाची अचूक नोंद केली जाते. यामुळे स्थान निश्चिती सोपी होते. सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता येते तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अचूक आणि वेळेत उपाययोजना करणे शक्य होते.