Child Dies During Play | खेळताना दोरीचा गळफास लागून शाळकरी मुलाचा मृत्यू File Photo
सातारा

Child Dies During Play | खेळताना दोरीचा गळफास लागून शाळकरी मुलाचा मृत्यू

घटनेने परिसर हळहळला

पुढारी वृत्तसेवा

भुईंज : जांब (ता. वाई) येथे एक काळजाला चटका लावणारी घटना घडली. खेळता खेळता दोरी गळ्याभोवती अडकली आणि अवघ्या अकरा वर्षाच्या असद या बालकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने सारा परिसर हळहळला. असद कमरूद्दीन इनामदार (वय 11, रा. जांब) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी, कमरुद्दीन रशीद इनामदार हे जांब ता. वाई येथील पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत आहेत. ते जांब ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा मोठा मुलगा हा नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. लहान मुलगा असद हा इयत्ता पाचवीच्या वर्गात जांबेतील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शिकत होता. तो आजारी असल्याने घरीच थांबला. घरी पाहुणे आल्याने आई पाहुणचार करत होती. त्यावेळी असद हा घरातील दुसर्‍या रूममध्ये छताला बांधलेल्या दोरखंडाशी झोका खेळत होता.

खेळता खेळता छताला लावलेल्या दोरीचा फास अचानक त्याच्या गळ्याभोवती आवळला गेला. काही वेळाने असदची आई त्याला पाहण्यासाठी आत गेली असता असद हा दोरीला लटकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरडा केला. तो ऐकून शेजारील लोकं मदतीला धावले. असद याला खाली उतरवले व तातडीने त्याला खाजगी वाहनाने भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी केल्यानंतर असदला मृत घोषित केले. या घटनेने उपस्थित नातेवाईकांनी आक्रोश केला. खेळता खेळता एका निष्पाप चिमुकल्याचा असा करून अंत झाल्याने जांब गावासह परिसरात शोककळा पसरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT