महागड्या स्कूल बसला पर्याय
अनधिकृत, धोकादायक रिक्षांपासून विद्यार्थ्यांना दिलासा
नवीन व्हॅनमध्ये जीपीएस ट्रॅकिंग, अग्निशमन यंत्रणा
आपत्कालीन दरवाजासह आधुनिक सुरक्षा सुविधा बंधनकारक.
सातारा : शालेय बसचे वाढते दर आणि अनधिकृत रिक्षांमधून होणारी धोकादायक विद्यार्थी वाहतूक, या दुहेरी संकटात सापडलेल्या राज्यातील पालकांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देत, परिवहन विभागाने आधुनिक सुरक्षा मानकांसह ’स्कूल व्हॅन’ परवाने पुन्हा खुले करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिकृत अधिसूचना लवकरच जारी होणार असून, या धाडसी पाऊलामुळे महाराष्ट्र हे अत्याधुनिक सुरक्षा सुविधांनी युक्त स्कूल व्हॅन चालवणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
सध्या अनेक शहरांमध्ये स्कूल बसचे दर सर्वसामान्य पालकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे नाइलाजास्तव अनेक पालक आपल्या मुलांच्या वाहतुकीसाठी अनधिकृत आणि असुरक्षित रिक्षांचा पर्याय निवडतात. या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी कोंबले जातात आणि सुरक्षेची कोणतीही हमी नसते. पालक आणि बस संघटनांच्या बैठकीत हा मुद्दा प्रकर्षाने मांडण्यात आल्यानंतर, सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी पावले उचलली आहेत.
केंद्र सरकारच्या स्कूल बस नियमावलीच्या (एआयएस-063) आधारावर, राज्याने आता स्कूल व्हॅनसाठी नवी नियमावली (एआयएस-204) तयार केली आहे. यानुसार, 12+1 आसन क्षमतेच्या चारचाकी वाहनांना ‘स्कूल व्हॅन’चा दर्जा दिला जाईल. या व्हॅनमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक आधुनिक सुविधा बंधनकारक असतील. यामध्ये जीपीएस व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम, अग्निशमन अलार्म यंत्रणा, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी दरवाजा, विद्यार्थ्यांच्या बॅग आणि इतर साहित्य ठेवण्यासाठी सुरक्षित जागा (स्टोरेज रॅक) आणि चालकासाठी ओळखपत्र यांचा समावेश आहे.
यापूर्वी 2018 पर्यंत स्कूल व्हॅन परवाने दिले जात होते, मात्र काही याचिकांमुळे ते बंद करण्यात आले होते. आता नव्या आणि अधिक कडक नियमांमुळे व्हॅन अधिक सुरक्षित झाल्या आहेत. रिक्षाच्या तुलनेत चार चाके असल्याने व्हॅन उलटण्याचा धोका नगण्य असतो आणि बंद दरवाजे अतिरिक्त सुरक्षा देतात. या निर्णयामुळे केवळ विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होणार नाही, तर अनेकांसाठी रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, असे परिवहन मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.