सातारा : पहिलीपासून हिंदी भाषेचे ज्ञान घेणे सक्तीचे केले तर ते पूर्णपणे चुकीचे, असंवेदनशील आणि अशास्त्रीय आहे. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. राष्ट्रभाषेचा दर्जा असलेल्या 18 भाषा आहेत, मग त्या सर्वच सक्तीच्या करायच्या का? त्यामुळे मुलांना त्यांच्या आईच्या भाषेत शिकू द्या. हिंदी सक्तीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी अभिनेते सयाजी शिंदे यांनी केली आहे.
सातार्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, हिंदी भाषा सक्तीचे करणे हे पूर्णपणे चुकीचे, असंवेदनशील, अशास्त्रीय आहे. आज मी जो काही आहे, तो माझ्या मराठी भाषेमुळे आहे. माझ्या आईची, गावाची, तालुक्याची, जिल्ह्याची आणि राज्याची भाषा ही मराठी आहे. या परिस्थितीत हिंदीची सक्ती लहाणपणी कशासाठी करतात. मराठी इतकं समृध्द वाड्मय कुठल्याच भाषेत नाही. ज्या मुलांना अजून मराठीचं व्याकरणही कळत नाही, त्याच वेळी हिंदी भाषा सक्तीची केली जाणे चुकीचे आहे.
लाखो लोकांना हे पटत नाही, त्यामुळे त्यांना हिंदी सक्तीला विरोध केला गेला पाहिजे. 5 वीनंतर हिंदीची सक्ती करणे योग्य आहे. मी 12 भाषेत काम करतो. मात्र, हे काम करत असताना मी आधी माझ्या आईच्या भाषेत विचार करतो. मुख्यमंत्र्यांनी काहीही करावे पण हे धोरण मागे घ्यावे. जनतेने शासनाला हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यायला भाग पडले पाहिजे.
सर्व कलावंतांचा प्रतिनिधी म्हणून मी बोलतोय. जिल्हा परिषद शाळेचा पट घसरतो आहे, हे अतिशय वेदनादायी आहे. आम्हाला इंग्लिश येत नाही म्हणून हिणवले जात होते. मात्र, आम्ही कमीपणा मानून घेतला नाही. माझ्या आई- वडिलांनी शिकवले त्याला जाती-जातीचे भेद नव्हते. नंतर न्यूनगंड आणला गेला आणि मराठी शाळा मागे पडल्या. घटनेनुसार हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा नाही. 18 राष्ट्रभाषा आहेत. एवढंच वाटत असेल तर मराठी भाषा हरियाणा, गुजरातला शिकवा. मुख्यमंत्री मराठीत शिकले असतील तर त्यांनी हिंदी भाषेची सक्ती करु नये, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.