पळशी : सातारारोड येथे बुधवारी आठवडा बाजाराच्या दिवशी कोरेगाव तहसीलदार कार्यालयाच्या पुरवठा विभागाने धडक तपासणी मोहीम राबवत मुख्य बाजारपेठेतील राजपुरोहित स्वीट मार्टवर कारवाई करून घरगुती वापराचा एक गॅस सिलेंडर जप्त केला. या कारवाईमुळे सातारारोड परिसरात खळबळ उडाली आहे.
बुधवारी आठवडा बाजाराच्या दिवशी नागरिकांची गर्दी होत असल्याची बाब लक्षात घेऊन पुरवठा निरीक्षक गौरव माने यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अचानक तपासणी मोहीम सुरू केली. या पथकामध्ये सातारारोडचे मंडलाधिकारी अशोक तारळकर, ग्राम महसूल अधिकारी महेश देवकर तसेच पुरवठा लिपिक प्रशांत कदम यांचा समावेश होता. या पथकाने सातारारोड गावातील विविध हॉटेल व्यवसाय आणि स्वीट मार्टमध्ये तपासणी केली.
या दरम्यान मुख्य बाजारपेठेतील राजपुरोहित स्वीट मार्ट येथे घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक कारणासाठी वापर होत असल्याचे आढळून आले. यानंतर पुरवठा निरीक्षक माने यांनी तत्काळ संबंधित गॅस सिलेंडर जप्त केला.