सातारा

Satara : जावली बँकेचे रणांगण तापले

backup backup

मेढा; भास्कर धनावडे : जावली तालुक्याची आर्थिक वाहिनी असणार्‍या ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या अध्यात्मिक विचारांनी प्रेरित जावलीसह जिल्ह्यातील कष्टकरी, कामगार, नोकरदार, उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार्‍या एकमेव आर्थिक संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्याने आता ऐन पावसाळ्यात जावली बँकेचे रण चांगलेच तापणार आहे. दरम्यान ऐन पावसाळ्यात जावली बँकेत धुमश्‍चक्री रंगणार?की निवडणूक बिनविरोध होणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

जावली सहकारी बँकेची धुरा गेली दोन पंचवार्षिक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे संचालक मंडळ संभाळत आहे. मध्यंतरी झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आ. शशिकांत शिंदे यांच्या पराभवामुळे तसेच या पराभवात वसंतराव मानकुमरे हे मुख्य सुत्रधार राहिल्याने आ.शिंदे व मानकुमरे यांच्यात जोरदार वैमनस्य निर्माण झाले आहे. त्यामुळे आ.शिंदे यांचा मानकुमरेंना बाजूला करून महाविकास आघाडीतील सर्व नेतेमंडळींची मोट बांधून मानकुमरे यांचाच पत्ता कट करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर, दुसरीकडे कावडी येथील कार्यक्रमात मानकुमरे यांनी अगोदरच तिकीट वाटप करून करहर, कुडाळ विभागात कोणाला तिकीट द्यायचे? हे जाहिर केल्याने एकच खळबळ उडाली.

ज्या कळंबे महाराजांनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी बँकेची स्थापना केली, तो हेतू बाजूला जावून आता यात राजकीय हस्तक्षेप वाढल्याने कळंबे महाराजांच्या विचारांची पायमल्ली होत आहे.वसंतराव मानकुमरे यांना बाजूला ठेवून या बँकेची निवडणूक बिनविरोध करावी, अशी प्रतिक्रीया बँकेचे माजी चेअरमन योगेश गोळे यांनी व्यक्त केली आहे. तर, आ.शिवेंद्रराजे यांनी जावली बँकेत कोणीही राजकारण न आणता सर्वांनी एकत्रित बसून आपण ही बँक बिनविरोध करू , असे सांगितले आहे. ज्या कोणाला निवडणुकीची जास्त खुमखुमी आहे त्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती अथवा इतर निवडणुकीत दाखवावी. जावली बँक ही तालुक्याची एकमेव सहकारी संस्था जिवंत असून तिला उभारी देण्याचे काम तालुक्यातील सर्व नेतेमंडळींनी करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

वसंतराव मानकुमरे यांनी बिनविरोधसाठी धूम ठोकली आहे. त्यांच्याबरोबर संचालकही आहेत. असे असली तरी आता आ. शिंदे यांच्याबरोबर अमित कदम, योगेश गोळे, माजी आमदार सदाभाऊ सपकाळ हे आहेत. त्यामुळे आ. शिवेंद्रराजे भोसले, वसंतराव मानकुमरे आणि त्यांची विद्यमान संचालक टीम यांच्यात आणि विरोधी गटात काय चर्चा आणि गोळाबेरीज होते यावर निवडणुकीचे पुढील गणित ठरणार आहे. बँकेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी एका विद्यमान संचालकास तुरुंगवास भोगावा लागत आहे. संस्थेची आर्थिक स्थिती पाहता बँकेला ही निवडणूक परवडणारी नाही, असे बोलले जात आहे.मात्र, दरवेळी बिनविरोध होणार असे ज्या बँकेबाबत बोलले जाते तिथे दरवेळेला जोरात धुमशान होते. त्यामुळे जावली बँकेसाठी निवडणूक अटळ मानली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT