सातारा

सातारा : झेड.पी.च्या प्रारूप रचनेवर आज शिक्कामोर्तब

backup backup

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी शनिवार, दि. 7 मे रोजी राज्य निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे. दि. 11 मार्च 22 रोजीच्या अधिनियमातील सुधारणा अस्तित्वात येण्यापूर्वी दि. 10 मार्च 22 रोजी असलेली प्रभाग रचनेची कार्यवाही ज्या टप्प्यावर होती. तेथून पुढे आयोगाने कार्यवाही सुरू केली आहे.

प्रभागाचे नकाशे गुगल नकाशावर सुपर इंपोज करण्यात येणार आहेत. जनगणनेची आकडेवारी लिंक करण्यात येणार आहे. या कामकाजासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रभाग रचनेचे कामकाज हाताळणारे अधिकारी व कर्मचार्‍यांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे तसेच जनगणनेची आकडेवारी, निवडणूक विभाग, निर्वाचक गणांची गावनिहाय आकडेवारी आणि नकाशे तपासणीसाठी शनिवार, दि. 7 मे रोजी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उपस्थित राहावे, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे उप आयुक्त अविनाश सणस यांनी काढला आहे. त्यामुळे शनिवारी जिल्हाधिकार्‍यांनी सादर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी होऊन अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेच्या सध्या 64 गट व 128 पंचायत समिती गण आहेत. मात्र, नगरपालिका हद्दवाढीमुळे एकगट व दोन गण कमी झाले आहेत. मात्र, दि. 28 एप्रिल 22 रोजी प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात सातारा जिल्हा परिषदेमध्ये सदस्य संख्या 74 निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे 10 गटांची नव्याने रचना झाली आहे. राज्य शासनाने 2011 च्या जनगणनेच्या आधारे अगामी निवडणुकीसाठी सदस्यांची संख्या निश्चित केली आहे. जिल्हा परिषदेचे 10 गट वाढल्याने पंचायत समितीचेही 20 गण वाढले आहेत. त्यामुळे पंचायत समिती सदस्यांची संख्या आता 148 वर जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या नव्या गटरचनेनुसार कराड तालुक्यात 2, फलटण तालुक्यात 2, खटाव तालुक्यात 2, कोरेगाव 1, पाटण 1, सातारा 1 व वाई तालुक्यात 1 असे मिळून 10 गट वाढण्याची शक्यता आहे. प्रारूप प्रभाग गट व गणाची अंतिम रचना, आरक्षण सोडत झाल्यानंतरच गावोगावी राजकीय रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.
सध्या इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

SCROLL FOR NEXT