सातारा : मुख्यमंत्र्यांच्या अपेक्षेप्रमाणे पक्ष वाढवण्याची जबाबदारी प्राधान्याने पार पाडत आहे. आगामी सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचीच सत्ता येणार, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.
ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ’हरित सातारा’ या अभियानाचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा पालिका व वृक्षसंवर्धन संस्था यांच्या माध्यमातून सातार्यात करण्यात आला. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
तुमच्या नेतृत्वाखाली पाटणमधून सत्यजित पाटणकर यांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, याकडे लक्ष वेधले असता ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने पक्ष वाढवण्याची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार काम करत आहे. सातारा जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता येण्यास काहीच अडचण वाटत नाही. झेडपीत भाजपचीच सत्ता येणार याची खात्री कार्यकर्ते व पदाधिकार्यांना वाटते, असे ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.
मान्सूनपूर्व पावसाने रस्त्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत विचारले असता ना. शिवेंद्रराजे म्हणाले, कमी दिवसांत जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे दरडी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. सध्या पाऊस उघडला असला तरी पावसाळ्यातील परिस्थितीचा विचार करता रस्त्यांच्या संपूर्ण दुरूस्तीचे नियोजन करण्यात येणार आहे. बांधकाम विभागाने त्यादृष्टीने काम सुरू केले आहे. पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे, त्याचे अहवाल घेऊन दुरूस्तीचे प्रस्ताव तयार करण्याचे काम संपूर्ण महाराष्ट्रात बांधकाम विभागाने सुरू केले आहे.
ना. शिवेंद्रराजे म्हणाले, महायुतीच्या मंत्र्यांसह संबंधित खात्याचे मंत्री पाहणी करत आहेत. विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरे कामच नसते. त्यांची टीका खरी नाही. ऊन्हाळी पिके व फळ पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यांना शासनाच्यावतीने मदत करण्यात येणार आहे. पालखी मार्गाच्या दुरूस्तीबाबत विचारले असता ना. शिवेंद्रराजे म्हणाले, दरवर्षी देखभाल दुरूस्ती केली जाते. पालखीच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या उपाययोजना कराव्या लागतात त्या बांधकाम विभागाकडून केल्या जात असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा पोलिस प्रमुख तुषार दोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे आदि उपस्थित होते.
सातार्यातील ओढ्यांवरील अतिक्रमणांबाबत विचारले असता, ना. शिवेंद्रराजे म्हणाले, ओढ्यांवरील अतिक्रमणे आपल्याच नागरिकांची आहेत. यामुळेच गोडोलीत पूर्वी घरांत पाणी घुसले होते. अतिक्रमणांवर कारवाई करणे ही प्रत्येकाच्यादृष् टीने अप्रिय घटना असते. त्यामुळे शहरातील शिल्लक ओढे बांधून घेण्यात येत आहेत. त्यामुळे कुणाच्या घरात पाणी शिरण्याचा प्रश्न उरणार नाही. तसेच ओढ्यातही अतिक्रमणे होणार नाहीत. ओढे नीटनेटके बांधून घेऊन त्यांचा प्रवाह विना अडथळा राहिल यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी निधीही शासनाने दिला आहे. सर्व ओढे कॅनॉलसारखे बांधून घेण्यात येणार आहे. पाण्याबरोबर आलेली घाणही निघून जाईल आणि ओढे स्वच्छ ठेवण्यास त्यामुळे मदत होणार आहे.