सातारा : सातारा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील सत्ता स्थापनेचे राजकीय त्रांगडे अद्यापही सुटलेले नाही. शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. 20 मार्चपूर्वी या निवडी करण्याचे आदेश काढले असले तरी अद्यापही साताऱ्याच्या प्रशासनाकडून त्याबाबत कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत.
साताऱ्यालगतच्या सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्हा परिषद व पंचायत समिती सभापती निवडींचा कार्यक्रम जाहीर झाला असताना सातारा जिल्हा परिषदेचा निवडणूक कार्यक्रम अद्यापही जाहीर झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात उलट सुलट चर्चांना ऊत आला आहे. साताऱ्याबाबतच वावडे का?, यामागे कुणाचा राजकीय खोडा तर नाही ना? असे प्रश्न जिल्ह्यात चर्चिले जात आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल दि. 9 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. त्यानंतर 24 दिवस उलटले तरीही जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती तसेच 11 पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापती निवडींचा कार्यक्रम लावण्यात आलेला नाही. नुकताच शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. 20 मार्चपूर्वी या निवडी करण्याचे आदेश काढले होते. मात्र त्याच्यावर अद्यापही काही कार्यवाही सातारा जिल्ह्यात सुरू नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
सातारा जिल्हा परिषदेत सर्वाधिक 27 जागा जिंकत भाजप नंबर 1 पक्ष ठरला असला तरी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहूमत मिळालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला 20, शिवसेना शिंदे गट 15 तर काँग्रेस 1 व अपक्ष 2 असे पक्षीय बलाबल आहे. तर 11 पंचायत समित्यांमध्ये भाजपाचे एकहाती सत्ता आणण्याचे स्वप्न भंगले आहे. भाजपाने सातारा, कराड व खटाव तर राष्ट्रवादी काँग्रेसने खंडाळा, कोरेगाव व वाई तसेच शिवसेना शिंदे गटाने पाटण पंचायत समितीमध्ये निर्विवाद सत्ता मिळवली आहे. महाबळेश्वर, जावली, माण व फलटण पंचायत समितीमध्ये सत्तेचे त्रांगडे निर्माण झाले आहे.
राज्याच्या ग्रामविकास विभागाने 20 मार्चपुर्वी निवडी करून पहिली सभा घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार सातारा जिल्ह्याच्या लगत असलेल्या पुणे, सांगली, कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने पंचायत समिती सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील 10 पंचायत समितीमधील सभापती निवडी दि. 10 मार्च रोजी होणार आहेत. तर पुणे जिल्ह्यातील 13 पंचायत समितीमधील सभापती निवडी दि. 9 मार्च रोजी होणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील 12 पंचायत समितीमधील सभापती निवडीही दि. 9 मार्च रोजी होणार आहेत. मात्र साताऱ्यात अद्यापही प्रशासनाने का निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नाही? अशा उलट-सुलट चर्चांना ऊत आला आहे. साताऱ्यात प्रशासनामार्फत उशिराने निवडणूक कार्यक्रम काढण्याचे काय कारण? प्रशासनावर कोणाचा दबाव आहे का? असे विविध प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.