Satara ZP: शंभूराज - मकरंदआबा राहणार का ‌‘घट्ट‌’ शिवेंद्रराजे - जयकुमार करणार का काम ‌‘खट्ट‌’? Pudhari
सातारा

Satara ZP: शंभूराज - मकरंदआबा राहणार का ‌‘घट्ट‌’ शिवेंद्रराजे - जयकुमार करणार का काम ‌‘खट्ट‌’?

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीकडे राज्याचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा
हरीश पाटणे

सातारा : ज्यांनी जिल्हा परिषदांची स्थापना केली त्या यशवंतराव चव्हाण यांच्या सातारा जिल्ह्याची, ज्यांनी जिल्हा परिषदांमध्ये स्त्रियांना आरक्षण मिळवून दिले त्या शरद पवारांची, ज्यांनी जिल्हा परिषदांच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासाची गंगा पोहोचवता येते हे दाखवून दिले त्या अजितदादांची सातारा जिल्हा परिषद सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर हेलकावे खात आहे.

निवडणुकीपूर्वी एकत्र राहिलेले शंभूराज देसाई व मकरंदआबा पाटील निवडणुकीनंतरही एकत्र नांदायला निघाले असले तरी दि. 20 रोजी होणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीत ते मुद्द्याला ‌‘घट्ट‌’ राहणार का? साताऱ्याची जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचे मनसुबे बाळगणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार भाजपला सत्तेत सामील करून घेणार? की राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेमध्ये फोडाफोडी करून पहिल्यांदाच सातारा जिल्हा परिषदेत परिवर्तन घडवत शिवेंद्रराजे भोसले व जयकुमार गोरे ‌‘खट्ट‌’ काम करून दाखवणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपैकी नगरपालिकांमध्ये भाजपचा वारू सातारा जिल्ह्यात चौखूर उधळला. पहिल्यांदाच भाजपने अनेक ठिकाणी परिवर्तन करत नगरपालिका ताब्यात घेतल्या. त्यामुळेच राज्यात महायुती असतानाही भाजप स्वबळावर लढली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (एकत्रित), शिवसेना (शिंदे गट) व काँग्रेस बहुतांश ठिकाणी एकत्र लढले. जागांचेही वाटप कुशलतेने करून राष्ट्रवादी शिवसेनेने एकमेकांचे उमेदवार निवडून आणण्यात मेहनत घेतली. याच्या उलट स्वबळावर सत्तेत येतील असे वातावरण असतानाही अंतर्गत फंदफितुरी व उमेदवार देण्यात झालेल्या गडबडी यामुळे स्वबळावर सातारा जिल्हा परिषदेत परिवर्तन करण्याचे भाजपचे स्वप्न भंगले. भाजपला 27, राष्ट्रवादी काँग्रेसला 20, शिवसेना शिंदे गटाला 15, काँग्रेसला 1, स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 व अपक्ष 1 असे 65 जणांचे बलाबल झाले आहे.

जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी 33 सदस्य संख्या होणे आवश्यक आहे. कोणत्याही पक्षाकडे ही मॅजिक फिगर नसल्याने सत्तेचा लंबक पळवण्यासाठी गेले कित्येक दिवस बऱ्याच राजकीय कुलंगड्या सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस - शिवसेना व काँग्रेस निवडणूकपूर्व एकत्र राहिल्याने त्यांनी निवडणुकीनंतरही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील, खा. नितीनकाका पाटील, आ. रामराजे ना. निंबाळकर, आ. महेश शिंदे या सर्वांनी एकत्र येत बैठकही घेतली. त्यातच स्वाभिमानीचे राजू शेळके यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या गटालाच पाठींबा दिला. त्यामुळे या एकत्रित गटाची संख्या 37 पर्यंत जावून पोहोचली. तर अपक्ष निवडून आलेल्या रामकृष्ण वेताळ यांना भाजपने किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पद दिल्याने त्यांच्या पत्नीने भाजपला पाठींबा दिला आहे. भाजपची संख्या त्यामुळे 28 झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी खटाव तालुक्यातील बुध जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या लता कर्णे या भाजपला जावून मिळाल्याच्या बातम्या बाहेर पडल्या. त्यातच फलटण पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अचानकपणे भाजपमध्ये प्रवेश केल्याने तिथे भाजपचा सभापती झाला.

तीच पुनरावृत्ती राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या सदस्याकडून होण्याची शक्यता असल्याचे भाजपचे नेते सांगत असल्याने ही संख्या 30 वर जाते. बहुमतासाठी भाजपला आणखी 3 जागा कमी पडत आहेत. भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवण्याच्या हालचाली जोरदार सुरु आहेत. त्याचे प्रात्यक्षिक त्यांनी फलटणमध्ये दिले आहे. एक महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे व शिवसेनेचे निवडून आलेले सदस्य भारत भ्रमंती करत करत जिल्ह्याच्या वेशीवर येवून विसावा घेत आहेत. जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी त्यामुळे जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

प्रत्यक्ष निवडणुकीत अनेक ठिकाणी मकरंद पाटील विरुद्ध जयकुमार गोरे यांची शाब्दिक जुगलबंदी झाली तर शंभूराज देसाई विरुद्ध जयकुमार गोरे यांच्यातही टोकाची टिका झाली. एकमेकांनी एकमेकांवर कठोर वार केले. काही ठिकाणी शिवेंद्रराजे भोसले व शंभूराज देसाई यांच्यातही तणातणी झाली. फलटणला तर रामराजे ना. निंबाळकर विरुद्ध रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्यात रोजच खडाखडी सुरु होती. असे असले तरी राज्यात महायुती असल्याने आपण जिल्हा परिषदेत एकत्र राहू, असा प्रस्ताव भाजपने दिला आहे. सातारच्या दौऱ्यावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्हा परिषदेत स्वबळावर सत्ता आणा, असे आदेश दिले होते. आता तेच मुख्यमंत्री जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेत सामील करुन घेण्यासाठी शंभूराज देसाई व मकरंद पाटील यांना गळ टाकणार असल्याचे बोलले जात आहे.

निवडणुकीच्या रणांगणात जे घडले ते न विसरता शंभूराज व मकरंदआबा ठरवलेल्या मुद्याला घट्ट राहणार का? अजितदादा असते तर परिस्थिती वेगळी होती पण आता सुनेत्रा वहिनी नेतृत्व करत आहेत. त्याच पक्षाचे दुसरे नेते सुनील तटकरे यांचे फडणवीसांशी सख्य आहे. त्यामुळे मकरंदआबा व नितीनकाकांवर दबाव येणार का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शंभूराज देसाई यांना कोणता सल्ला देणार? रामराजे ना. निंबाळकर या एकजुटीला साथ देणार का? राष्ट्रवादीपेक्षा भाजपशी जास्त सलगी असलेले आमदार महेश शिंदे त्यांच्या सदस्यांना कोणाकडे सोपवणार आणि सर्वांत महत्वाचेया सर्व नेत्यांच्या सदस्यांपैकी अध्यक्षपदावरुन कोण फुटणार तर नाही ना? यावर राष्ट्रवादी व सेनेच्या सत्तेचे गणित अवलंबून आहे. हे सगळे डाव जुळून आले तरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या गुढीला शिवसेनेची गोड घाटी लगडलेली दिसेल.

दुसऱ्या बाजूला भाजपमधून शिवेंद्रराजे भोसले व जयकुमार गोरे यांचे जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेत नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दोन सदस्य आधीच त्यांच्या गळाला लागल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष घातले तर शिवेंद्रराजे व जयकुमार गोरे ऑपरेशन लोटस यशस्वी करु शकतात. राष्ट्रवादीचे व शिवसेनेचे काही सदस्य अनुपस्थित ठेवण्याच्या दृष्टीनेही हालचाली सुरु आहेत. आ. महेश शिंदे यांच्याकडे दोन सदस्य आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याशी आ. महेश शिंदे यांचे असलेले संबंध पाहता व त्यांची पत्नी भाजपमधून निवडून आल्याने ते ऐनवेळी कोणती भूमिका घेतात यावरही सत्तेचे गणित अवलंबून राहील. दुसऱ्या बाजूला शिवेंद्रराजे भोसले व मकरंदआबा पाटील यांच्या मैत्रीचा सेतूही भाजपला सत्तेत आणू शकतो. त्या दृष्टीनेही प्रयत्न सुरु असल्याचे कळते.

राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र निवडणूक लढल्याने त्यांच्या एकत्रित गटाकडे अध्यक्षपद व भाजपकडे उपाध्यक्षपद असा फॉर्म्युलाही ऐनवेळी येवू शकतो. ऑपरेशन लोटस यशस्वी झाले नाही तर भाजप हा समजदारीचा मार्गही वापरु शकतो. मात्र, त्यात शिवेंद्रराजे व मकरंदआबा पाटील यांनाच पुढाकार घ्यावा लागेल आणि शंभूराज देसाई यांची समजूत काढावी लागेल. अर्थात निवडून आलेल्या सदस्यांचा विचार मकरंदआबा व शंभूराज देसाई यांना घ्यावाच लागणार आहे. त्यामुळे ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेनेची सत्ता जिल्हा परिषदेत दिसली तर आश्चर्य वाटायला नको. शिवेंद्रराजेंची चाणक्यनीती व जयकुमार गोरे यांना घ्यावा लागणारा सॉफ्टनेस यावर ही रणनीती अवलंबून राहील. कोल्हापुरात राष्ट्रवादीचा, सांगलीत राष्ट्रवादीचा अध्यक्ष झाल्याने साताऱ्यात अजितदादांच्या जिल्हा परिषदेत अध्यक्षपद कोणाकडे येणार? याविषयी उत्सुकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT