सातारा : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून विधानसभा मतदारसंघनिहाय जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची माहिती तयार करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार याद्यांचे काम सुरू झाले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 8 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने मतदार यादीचे काम सुरू केले आहे. यासाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदारयादी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार याद्यांची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिली आहे. या माहितीच्या आधारे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या मतदार संख्येनुसार याद्या फोडण्यात येणार आहेत. कोणती गावे कोणत्या गटात व गणात आहेत याची मााहिती तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. मदररोल तयार करणे, कंट्रोल चार्टमध्ये माहिती भरण्याचे काम सुरू झाले आहे.