Fake Milk Pudhari
सातारा

Satara News : 'अन्न व औषध'च्या शिंदेंना आयुक्तांची नोटीस

शामगाव सेटलमेंट प्रकरणात खुलासा सादर करण्याचे दिले आदेश

पुढारी वृत्तसेवा

सातारा : शामगाव (ता. कराड) येथील बोगस दूध रॅकेट सेटलमेंट प्रकरण आता थेट अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचले आहे. सातार्‍याचे सहायक आयुक्त संजय शिंदे यांना आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आयुक्त कार्यालयाने शामगाव प्रकरणात कारणे दाखवा नोटीस काढल्याची माहिती सूत्रांनी दिली. दै. ‘पुढारी’ने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर आयुक्त कार्यालयाने गंभीर दखल घेत शिंदेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

एकीकडे राज्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार राज्यभर भेसळखोरांवर कडक कारवाया सुरू आहेत. मात्र ­ जिल्ह्यात या कारवाईचे वेगळेच रूप समोर येऊ लागले आहेत. सातार्‍यात‘एफडीए’चे काही अधिकारी हॉटेल व्यावसायिक तसेच व्यापारी वर्गावर कारवाईची भीती दाखवून गैरप्रकार करत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. मुंढे यांच्या शिस्तीच्या धाकाचा गैरवापर करून काही अधिकारी स्वत:ची पोळी भाजत असल्याची जिल्ह्यात उघडपणे चर्चा होऊ लागली आहे. भेसळखोरांवर कारवाई करण्याऐवजी प्रामाणिक व्यावसायिकांना त्रास देण्याचे प्रकार सुरू असल्याने व्यापारी वर्गात तीव्र नाराजी पसरली आले.

शामगाव बोगस दूध रॅकेटविरोधात पहिल्या कारवाईत सेंटलमेंट झाल्याचे उघड झाल्याने वरिष्ठ पातळीवर सातार्‍याच्या ‘एफडीए’चे कान टोचले गेले. त्यानंतर दुसर्‍या कारवाईत शामगावातील बोगस दुधाच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. मात्र पहिली कारवाई फेल का गेली? याची चर्चा सुरू झाल्यावर त्यामध्ये मोठी सेटलमेंट झाल्याचे समोर आले.

याबाबत दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत राज्याच्या मुंबई अन्न व औषध प्रशासनने सातार्‍याचे सहायक आयुक्त संजय शिंदे यांना कारणे दाखवा नोटीस काढल्याची माहिती आयुक्त कार्यालयातील सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे शिंदे यांची विभागीय चौकशी होणार का? शामगाव सेटलमेंट प्रकरणात नेमका कितीचा ‘व्यवहार’ झाला? पहिल्या रेडनंतर पुरावे नष्ट होण्यास संधी का दिली गेली? आयुक्त कार्यालयाच्या नोटिशीनंतर शिंदे यांनी खुलासा केला का? विभागीय चौकशी तातडीने का सुरू होत नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मुंढेंच्या नावाचा अधिकार्‍याकडून गैरवापर

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासारख्या डॅशिंग अधिकार्‍याच्या नावाचा सातार्‍यात गैरवापर सुरू असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. तसे होत असेल तर अशा अधिकार्‍यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. शामगाव प्रकरणाची पारदर्शक व तातडीने चौकशी झाली तरच सातार्‍याच्या अन्न व औषध प्रशासनावर लोकांचा विश्वास बसेल, अशा प्रतिक्रिया जिल्हावासीयांतून व्यक्त होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT