सातारा

Satara : काल्पनिक वेतनवाढ प्रस्तावासाठी द्या ४ हजार

झेडपी परिसरात खासगी एजंटाचा सुळसुळाट

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्हा परिषदेमध्ये कॅन्टीन परिसरात काल्पनिक वेतनवाढीचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून फाईल जमा करण्यासाठी बुधवारी सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षकांची गर्दी झाली होती. झेडपी परिसरातच खासगी एजंटने कार उभी करून त्यामधून हा कारभार सुरू केला. त्यातून मलिदा लाटला जात असून प्रत्येकी ४ हजारांची वसुली होत आहे. हा सावळागोंधळ झेडपीच्या प्रांगणात घडत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

निवृत्त शिक्षकांना सेवाकाळातील काल्पनिक वेतनवाढीचा लाभ मिळण्याच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागामार्फत देण्यात आल्या होत्या. त्यानुसार निवृत्त शिक्षकांचे वेतनवाढ प्रस्ताव मुंबईला पाठवण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील विविध शाळा व विद्यालयामधून निवृत्त झालेले माध्यमिक शिक्षक फाईल तयार करून जिल्हा परिषदेच्या परिसरात आले होते. जिल्हा परिषद कॅन्टीन परिसरात संबंधित खासगी एजंटाने कार उभी करून सर्व खटाटोप सुरू केला होता. फाईलमध्ये आवश्यक कागदपत्रे, सेवा, नोंदी, वेतन निश्‍चितीशी संबंधित कागदपत्रे आदींची पूर्ततेसाठी शिक्षकांची धावपळ सुरू होती.

वेतनवाढीसाठी संघटनेकडून हा सर्व प्रकार सुरू आहे. मात्र, याबाबत प्रभारी माध्‍यमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर व वेतन पथकाचे अधीक्षक सुनील शिखरे यांनी या प्रकाराशी काही संबंध नाही व शासनाचे असे कोणतेही परिपत्रक नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले.

कोर्ट कामासाठी अडीच व इतर कामांसाठी दीड हजार

प्रत्येक परिपूर्ण फाईलसाठी ४ हजार रुपयाची वसूली केली जात होती. २ हजार ५०० रुपये कोर्ट कामासाठी व १ हजार ५०० अन्य खर्चासाठी घेतले जात होते. शिक्षकही काल्पनिक वेतनवाढ मिळणार असल्‍याच्‍या अपेक्षेने पैसे देण्यासाठी मागेपुढे पाहत नव्हते. मोठी गर्दी झाल्याने जिल्हा परिषदेमधील अधिकारी व कर्मचारीही याबाबतची विचारपूस करताना दिसत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT