सातारा

Satara ZP: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवड रद्द करा

कराडात सर्वपक्षीय निषेध मोर्चा; एकाधिकारशाही वापरून सत्ता स्थापन केल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

कराड : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी दरम्यान उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये सर्वपक्षीय आक्रमक झाले असून, निवड प्रक्रिया रद्द करून ती नव्याने घेण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रीय काँग्रेस, तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी कराडात निषेध आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकी दरम्यान पोलिसांनी पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोप करत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यासह 100 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे निर्देश दिल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. या निर्देशानंतर राजकीय वातावरण अधिक तापले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाईची मागणी जोर धरत आहे.

कराड येथील शिवतीर्थ दत्त चौकात दुपारी विविध पक्षांचे पदाधिकारी एकत्र आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला. या आंदोलनात सचिन पाटील (काढणेकर), मोहन कदम, नगरसेवक विजयसिंह यादव, राजेंद्र माने, अखिल भरतील मराठा संघाचे अनिलबापू घराळ, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष व जि.प. सदस्य नामदेव पाटील, रूपेश मुळे, वैशाली जाधव, विनायक भोसले, विवेक कुराडे पाटील, रोहन विभुते आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आंदोलनकर्त्यांनी यावेळी निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उमेदवारांना मतदानाचा अधिकार असताना प्रशासनाने हस्तक्षेप करून तो हिरावून घेतला. संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर पद्धतीने पार पडली असून, ही निवड आम्हाला मान्य नाही, असा आरोप करत जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक नव्याने घेण्याची मागणी करण्यात आली.

विजयसिंह यादव म्हणाले, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड अतिशय चुकीच्या पद्धतीने राबविली गेली आहे. प्रशासनाचा दुरोपयोग करून जर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडायचे होते तर निवडणूक प्रक्रिया राबविण्याची गरजच काय होती, थेट निकालाच जाहीर करायचा होता, अशा शब्दात यादव यांनी संताप व्यक्त केला. उमेदवारांना मतदार करण्याचा अधिकार असतानाही त्यांना मतदानापासून प्रशासनाने रोखले. लोकशाहीचा गळा घोटण्याचा हा प्रकार आहे, असा आरोप त्यांन केला.

सचिनपाटील म्हणाले, जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीवेळी प्रशासनाचा गैरवापर करून व पोलिस प्रशासनाच्या बळाचा वापर करून निवड प्रक्रिया राबविण्यात आली आहे. ती तत्काळ रद्द करावी. दरम्यान धिक्कार असो धिक्कार असो प्रशासनाचा धिक्कार असो.., निवडी रद्द करा, अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT