अजय कदम
खेड : सातारा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे 8 गट व पंचायत समितीच्या 16 गणांमधील वातावरण ढवळून गेले आहे. यावेळी खा. उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे दोघेही भारतीय जनता पक्षात असल्यामुळे निवडणूक मनोमीलनातून होणार का? याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे दोन्ही राजेंंच्या भूमिकेबाबत औत्सुक्य आहे. मनोमीलन झाले तर आपल्याला तिकीट मिळणार का?, जागा वाटपात नक्की काय होणार? याबाबची उत्सुकता इच्छुकांमध्ये आहे. दुसरीकडे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांची भूमिकाही काही गट व गणांमध्ये निर्णायक ठरणार आहे. तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी लक्ष घालण्याची तयारी केल्यामुळे दोन्ही राजे गटांच्या नाराजांवर त्यांची मदार राहणार आहे.
सातारा तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाची ताकद जास्त आहे. मागील वेळी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 10 पैकी 5 गटात ना. शिवेंद्रराजेंचे उमेदवार निवडून आले होते. तर 3 गटात खा.उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीचा विजय झाला होता. भाजपला दोन जागा मिळाल्या होत्या. आता तालुक्यात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली आहेत. दोन्ही राजे भाजपमध्ये असून ना. शिवेंद्रराजे यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी देत त्यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद दिले आहे. त्यामुळे त्यांना आपल्या मंत्रिपदाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपली ताकद दाखवावी लागणार आहे. जास्तीत जास्त गट कसे निवडून येतील, यासाठीही रणनिती आखावी लागणार आहे. खा. उदयनराजे काय भूमिका घेणार? हे पाहणेही उत्कंठावर्धक आहे.
सातारा तालुक्यातील परंतु कोरेगाव विधानसभा मतदारसंघात असलेल्या पाटखळ, कोडोली, खेड या गटांमध्ये ना. शिवेंद्रराजे भोसले, आ. महेश शिंदे, आ. शशिकांत शिंदे यांचे प्राबल्य मोठ्या प्रमाणावर आहे. मनोमीलनातून भाजपच्या चिन्हावर लढायचे ठरवले तर ना. शिवेंद्रराजे व खा. उदयनराजे कोणाला उमेदवारी देणार? यावर बरीच गणिते अवलंबून आहेत. तर आ. महेश शिंदे यांची भुमिका काय राहणार?, महाविकास आघाडीमधून आ.शशिकांत शिंदे तगडे आव्हान देणार का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वर्णे गटात गतवेळी भाजपमधून आ. मनोजदादा घोरपडे यांनी 9961 तर राष्ट्रवादी काँग्रेस मधून धनंजय शेडगे यांनी 9035 मते घेतली होती. तर साविआच्या गणेश देशमुख यांनी 2300 मते घेतली. या तुल्यबळ लढतीत आ. मनोज दादा घोरपडे 926 मताने विजयी झाले. यावेळी हा गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने चुरस कमी राहण्याची शक्यता आहे. लिंब, कारी, नागठाणे हा गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आला असल्याने या ठिकाणी मोठी चुरस निर्माण होणार आहे. काही गट व गणांमध्ये आ. शशिकांत शिंदे यांचाही प्रभाव असल्याने त्यांचीही भुमिका निर्णायक ठरू शकते.
परळी खोऱ्याचा समावेश असलेल्या कारी गटातील निवडणूक यंदा लक्षवेधक ठरणार आहे. या गटात ना. शिवेंद्रराजेंचे मोठे वलय आहे. या गटातून ना.शिवेंद्रराजेंचे निष्ठावंत, समर्थक राजूभैय्या भोसले यांच्या नावाची जोरदार हवा आहे. मध्यंतरीच्या काळात राजूभैय्या यांनी केलेल्या त्यागाची त्यांना पोहोच पावती मिळणार आहे. बऱ्याच कालावधीपासून पदांपासून वंचीत असलेले राजूभैय्या यावेळी जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा दिसण्याची शक्यता आहे.
नागठाणे गटात खा.उदयनराजे ना. शिवेंद्रराजे व आ. मनोजदादा घोरपडे हे एकाच पक्षात असल्याने या तिघांच्या निर्णयावरच या गटाच्या व गणाच्या निवडणुकीची समीकरणे अवलंबून असतील. तर या गट व गणात माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची भुमिकाही राहणार आहे. शेंद्रे गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असल्याने येथे प्रस्थापितांकडून सौभाग्यवतींची नावे पुढे केली जाणार आहेत. सातारा तालुका परंतु कोरेगाव विधानसभा मतदार संघात असलेल्या पाटखळ, कोडोली, खेड या गटात खा. उदयनराजे भोसले, ना. शिवेंद्रराजे भोसले, आ. महेश शिंदे, आ. शशिकांत शिंदे यांचे नेतृत्व मानणाऱ्या कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. पाटखळ गटात पडलेल्या सर्वसाधारण महिला आरक्षणाने चुरशीची लढत होणार आहे.
कोडोली गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झाला आहे. या गटात अनेक दिग्गज इच्छुकांची संधी हुकली आहे. पण जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा आरक्षणाचा उमेदवार या गटात असल्याने येथून निवडून येणारी महिलाही अध्यक्ष पदाची दावेदार असेल. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील महिलेसह कुणबी दाखला असलेल्या महिलेलाही येथे संधी आली आहे. विधानसभेसाठी हा गट कोरेगाव मतदारसंघात असल्याने खा उदयनराजे, ना. शिवेंद्रराजे यांच्या सोबतच आ.महेश शिंदे,आ. शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांत उमेदवारीसाठी चुरस पहायला मिळेल. दोन्ही राजेंना मानणाऱ्या या गटात स्थानिक नवीन चेहऱ्याला संधी मिळू शकते. तसेच कुणबी दाखला असलेली महिलाही नशीब आजमावून थेट जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची दावेदार होऊ शकते. या गटात स्व. रवी साळुंखे यांचे कायम वर्चस्व राहिले आहे. ते सध्या हयात नसले तरी त्यांच्या विचारांच्या कार्यकर्त्यांचा या गटात मोठा प्रभाव आहे. तोही विचारात घ्यावा लागणार आहे.
खेड या राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या गटात अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण पडले आहे. मागील निवडणुकीतील स्थित्यंतरे पाहिल्यानंतर या गटात सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, आ. महेश शिंदे, आ. शशिकांत शिंदे यांच्या गटातच राजकीय वर्चस्वाची दंगल रंगणार आहे. यामध्ये खा. उदयनराजे भोसले, ना.मकरंद पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. भाजपने स्वबळाचा नारा देत निवडणूक लढवल्यास आणि ना. शिवेंद्रराजेंनी स्वतंत्र उमेदवार दिल्यास आ.महेश शिंदे कोणती भूमिका घेणार? की वेगळी वाट चोखळतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आ.शशिकांत शिंदे यांना राजकीय ताकद पणाला लावावी लागणार आहे. या गटात ना. शिवेंद्रराजे, आ. महेश शिंदे यांची प्रतिष्ठा तर आ. शशिकांत शिंदे यांचे अस्तित्व दाखवण्यासाठी काँटे की टक्कर होण्याची चर्चा आहे. या गटात कामेश कांबळे, संदीप शिंदे व प्रविण धस्के यांच्यात जोरदार चुरस सुरु आहे.
तालुक्यातील पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. लिंब, कोंडवे, कोडोली, परळी, नागठाणे या गणात पंचायत समितीच्या सभापतीपदाची संधी असल्याने या गणातील विजयी उमेदवार सभापतीपदाचा दावेदार राहणार आहे. क्षेत्रमाहुली, वर्णे, संभाजीनगर हे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात येत असले तरी ना. शिवेंद्रराजे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तर आ. मनोजदादा घोरपडे,आ. महेश शिंदे व आ. शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांत उमेदवारीसाठी चुरस पहायला मिळणार आहे. पाटखळ व शिवथर गण इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने या गणासाठी उमेदवारांची वानवा आहे. काहींनी कुणबी दाखले काढून प्रमाणपत्र मिळविल्याची चर्चा आहे.
सातारा तालुक्यात जोरदार रणसंग्राम होणार असून लढ कोणाला म्हणायचं आणि थांबवायचं कोणाला ? असा यक्ष प्रश्न नेत्यांपुढे राहणार आहे. भाजपच्या धवल यशानंतर सातारा तालुक्यात या पक्षाकडे सर्वसाधारण प्रवर्गाच्या गट, गणातील इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. म्हणूनच उमेदवारी देताना हे नेते कोणती फुटपट्टी लावणार, कोणते मोजमाप लावणार हा कळीचा मुद्दा असून सातारा तालुक्यात महाविकास आघाडीचा हस्तक्षेप टाळण्यासाठी दोन्ही राजेंचे गट स्वतंत्र लढून महाविकास आघाडीला उमेदवार मिळवू न देण्याची काळजी घेऊ शकतात. त्यामुळे सातारा तालुक्यात दोन्ही राजेंच्या भुमिकेभोवतीच गट, गणांचे राजकारण फिरणार आहे. दुसरीकडे सातारा तालुक्याचा कराड उत्तर आणि कोरेगाव मतदारसंघात समाविष्ट भागातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना शिवेंद्रराजेंनी या वेळेस भाजपसोबत राहण्याची सुचना केली आहे. त्यामुळे येथून आ.महेश शिंदेंची भुमिका काय राहणार व सह्याद्री कारखान्याचे कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील कोणत्या बाजूने कौल देणार? हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
असे आहे गट व गणांचे आरक्षण
तालुक्यातील जि.प. गटाच्या आरक्षण सोडतीमध्ये खेड गट अनुसूचित जातीसाठी तर कोडोली नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, वर्णे गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आणि नागठाणे, कारी, लिंब सर्वसाधारण तर पाटखळ, शेंद्रे गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढणार असून राजकीय रस्सीखेच तीव्र होणार आहे. उमेदवार निवडताना दोन्ही राजेंची कसोटी पणाला लागणार आहे. राखीव जागांवर उमेदवार निवडताना दमछाक होणार असून नवोदितांना संधी मिळणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
सातारा तालुक्यात पंचायत समितीचे 16 गण असून अपशिंगे अनुसूचित जाती, खेड अनुसूचित जाती महिला, शिवथर, पाटखळ नागरिकांचा मागास प्रवर्ग, शेंद्रे, निनाम नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, संभाजीनगर, कारी, वर्णे अतीत, क्षेत्र माहुली सर्वसाधारण महिला तर लिंब, कोंडवे, कोडोली, परळी, नागठाणे हे गण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत.