सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक वातावरण चांगलेच तापू लागले आहे. भाजपने स्वबळाचा नारा दिल्याने महायुतीमधील घटक पक्ष व इतर पक्षांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला असून जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.याबाबत बुधवारी अधिकृत घोषणा होणार आहे. ज्या तालुक्यामध्ये ज्याची ताकद असेल त्यानुसार तेथे जागा वाटप होणार असल्याचे समजते. अर्ज माघारीपर्यंत मित्र पक्षांची बैठक घेवून एकच तगडा उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
मंगळवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कोयना दौलत या निवासस्थाची खलबते सुरू होती. बैठकीस आ. महेश शिंदे, संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, रणजित भोसले, जयवंत शेलार, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, फलटणचे अनिकेतराजे ना. निंबाळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप स्वतःची ताकद निर्माण करण्यासाठी घटक पक्षांना दाबत आहे. प्रत्येक ठिकाणी स्वबळाचा नारा देत निवडणूक लढवत आहे. त्यामुळे महायुतीमधील घटक पक्षांनी या बैठकीत नाराजी दर्शवत विरोधकांची एकत्र मूठ बांधत भाजपला रोखण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत गेल्या काही दिवसांपासून बैठकांचा सपाटा सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते व पालकमंत्री शंभूराज देसाई, अजित पवार गटाचे ना. मकरंद पाटील, शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, विधानपरिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर, माजी आ. बाळासाहेब पाटील यांच्याही बैठका होत आहेत. मंगळवारी झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीत सातारा तालुक्यात गट व गणामध्ये सर्व पक्ष एकत्रित येवून भाजपाविरोधात लढण्याचे ठरले. कोरेगाव तालुक्यात आ. महेश शिंदे यांच्याकडे जबाबदारी देण्याची चर्चा झाली असून त्याबाबत बुधवारी निर्णय जाहीर केला जाणार आहे. जावली तालुक्यात आ. शशिकांत शिंदे यांच्या विचाराने निवडणूक लढवली जाणार आहे. वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यात ना. मकरंद पाटील यांच्यासोबत राहून निवडणूक लढवली जाणार आहे. फलटण व पाटण तालुक्यातील गट व गणात धनुष्यबाणावरच सर्व उमेदवार उभे केले जाणार आहेत. कराड दक्षिणमध्ये माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण व ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या विचाराने निवडणूक लढवली जाणार आहे. कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील यांना सोबत घेवून निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरले. तसेच माण खटाव तालुक्यातील उमेदवारीबाबतचा निर्णय बुधवारी जाहीर केला जाणार आहे.
ज्याच्याकडे गट त्याच्याकडेच गणाची उमेदवारी
जिल्हा परिषदेच्या 65 गट व पंचायत समितीच्या 130 गणांनुसार उमेदवार देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यामध्ये ज्या पक्षाला गट दिला जाईल त्यांनाच गणही दिला जाणार आहे. तसेच आघाडीतील सर्वच पक्षांकडून आपल्या उमेदवारांना अर्ज भरण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. अर्ज माघारीपर्यंत सर्व मित्र पक्ष उमेदवारांची चाचपणी करून भाजपविरोधात गट व गणामध्ये एकच तगडा उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या सर्व घडामोडींबाबत बुधवारी अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिली.